

संयुक्त राष्ट्रे; वृत्तसंस्था : म्यानमारमधून पलायन केलेल्या रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी बंगालच्या उपसागरात उलटल्याची भीषण घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत ५०० हून अधिक निर्वासितांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, अलीकडच्या काळातील रोहिंग्या निर्वासितांशी संबंधित ही सर्वात मोठ्या सागरी दुर्घटनांपैकी एक ठरू शकते, अशी चिंता संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे.
आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटना (आयओएम) आणि संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्चायुक्त कार्यालय (यूएनएचसीआर) यांनी गुरुवारी संयुक्त निवेदन जारी करून या दुर्घटनेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. मृतांचा नेमका आकडा आणि घटनेची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसली, तरी प्राथमिक माहितीनुसार जीवितहानी अत्यंत मोठी असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या दोन्ही बोटी जूनच्या अखेरीस म्यानमारमधील संघर्षग्रस्त रखाइन (राखीन) राज्यातून निघाल्या होत्या. काही निर्वासितांनी शेजारील बांगला देशातील रोहिंग्या निर्वासित छावण्यांमधूनही या प्रवासाला सुरुवात केली होती. यापैकी एका बोटीत सुमारे २५० प्रवासी होते. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच या बोटीचा संपर्क तुटला. दुसऱ्या बोटीत सुमारे २८० जण प्रवास करत होते. ही बोट ८ जुलै रोजी म्यानमारच्या अयेयारवाडी किनारपट्टीजवळ उलटल्याचा अंदाज आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांनी सांगितले की, मान्सूनच्या काळात बंगालचा उपसागर अत्यंत धोकादायक बनतो. मुसळधार पाऊस, उंच लाटा आणि पूरस्थितीमुळे समुद्रातील प्रवास अधिकच जीवघेणा ठरतो. अशा प्रतिकूल हवामानात समुद्रमार्गे पलायन करण्याचा प्रयत्न अनेकांसाठी प्राणघातक ठरल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे.
बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रमार्ग हा अनेक वर्षांपासून रोहिंग्या निर्वासितांसाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. या मार्गावर हजारो निर्वासितांनी आतापर्यंत जीव गमावला असून, त्यामध्ये लहान मुले, नवजात अर्भके आणि गर्भवती महिलांचाही समावेश आहे.
यूएनएचसीआरच्या आकडेवारीनुसार, २०२५ मध्ये ६५०० हून अधिक रोहिंग्यांनी समुद्रमार्गे पलायन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यापैकी सुमारे ९०० जण मृत किंवा बेपत्ता झाल्याची नोंद आहे. त्यामुळे निर्वासितांच्या समुद्री प्रवासाच्या इतिहासातील ते सर्वाधिक जीवितहानीचे वर्ष ठरले. स्थलांतरित समुद्री मार्गांमध्ये बंगालचा उपसागर-अंदमान मार्ग हा सध्या सर्वाधिक मृत्युदर असलेला मार्ग आहे.
म्यानमारमध्ये लष्करी कारवाई आणि अत्याचारांमुळे लाखो रोहिंग्यांना घरे सोडावी लागली. सध्या सुमारे १२ लाख रोहिंग्या निर्वासित बांगला देशातील गर्दीच्या निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहेत; तर म्यानमारमध्ये राहणाऱ्या रोहिंग्यांच्या हालचालींवर निर्बंध, मूलभूत सुविधा आणि आरोग्यसेवांवरील मर्यादा अशा अनेक बंधनांचा सामना करावा लागत आहे. अनेकांना छावण्यांमध्येच राहण्यास भाग पाडले जात आहे.