‘ट्विटर’ चा खाेडसाळपणा, नकाशात दाखवले जम्मू-काश्मीर आणि लडाख वेगळे देश

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : ट्विटर वेबसाईटच्या नकाशात भारताचा चुकीचा नकाशा दाखवण्यात आला आहे. त्यामुळे सरकार ट्विटवर कारवाई करण्याची शक्यता आहे. ट्विटर वेबसाईटवरील नकाशावर जम्मू काश्मीर आणि लडाख हे वेगळे देश दाखवण्यात आले आहेत.  

भारताचा हा चुकीचा नकाशा ट्वीप लाईफवर प्रकाशित झाला होता. यात जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताच्या बाहेर दाखण्यात आला आहे. हा चुकाचा नकाशा एका ट्विटर युजरने निदर्शनास आणून दिला. त्याने यावर काही क्रोध व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रियाही दिल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार याच्यावर कठोर कारवाई करणार आहे. 

केंद्र सरकारच्‍या नवीन नियमावलीमुळे ट्विटर आणि सरकारमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणाव सुरु आहे. त्यातच आता या घटनेमुळे अजूनच भर पडली आहे. ट्विटरने भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांच्या काँग्रेस टूलकीटप्रकरणी केलेल्या एका पोस्टला 'छेडछाड केलेली माहिती' असे लेबल लावले होते. त्यानंतर सरकार आणि ट्विटरमध्ये तणाव निर्माण झाला हाेता. 

त्यानंतर ट्विटरने सरकारचे नवे नियम हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला धक्का लावतात असे मत व्यक्त केले होते. नव्या नियमानुसार ट्विटरला भारतात एक कंप्लायन्स ऑफिसर नेमायचा आहे. या नियमांना ट्विटरने थंडा प्रतिसाद दिला आहे. यामुळे ट्विटर भारतात कायद्याचे संरक्षण गमावू शकते. याबाबत सुरु असलेल्या सुनावणीवेळी ३१ मे रोजी ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयात आम्ही धर्मेंद्र चतुर यांची तक्रार निवारण अधिकारी म्हणून तातपूर्ती नियुक्ती करत असल्याचे सांगितले. धर्मेंद्र चतुर हे एका लॉ फर्ममध्ये पार्टनर आहेत. पण, सरकारने संस्थेबाहेरचा व्यक्ती या पदावर अधिकारी म्हणून चालणार नाही, असे स्‍पष्‍ट केले. 

धर्मेंद्र चतुर यांनी काही आठवड्यातच हे पद सोडले. आता ट्विटरने अमेरिकेतील ग्लोबल लीगल पॉलिसी डायरेक्टर जेरेमी केसेल यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून नियुक्त केले. पण, नव्या नियमानुसार हा अधिकारी भारतात वास्तव्यास असला पाहिजे. नुकतेच उत्तर प्रदेशमध्ये महेश्वरी यांना धार्मिक भावना दुखावणारा व्हिडिओ पसरवण्यापासून रोखण्यात अपयश आल्याने नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवारी कॉपी राईटवरुन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री रवी शंकर यांचे ट्विटर अकाऊंट एका तासासाठी लॉक करण्यात आले होते. 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news