

Tamil Nadu Election: तामिळनाडूच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून टीव्हीके (TVK) पक्षाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला आहे. पक्षाचे प्रमुख विजय यांनी राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना पत्र लिहून सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देण्याची विनंती केली आहे. तसेच विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
तामिळनाडू विधानसभेच्या निकालात टीव्हीकेने १०८ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. मात्र, २३४ सदस्यीय सभागृहात स्पष्ट बहुमतासाठी ११८ जागांची गरज असताना कोणत्याही पक्षाला ती संख्या गाठता आलेली नाही.
विशेष म्हणजे, विजय यांनी दोन मतदारसंघांमधून विजय मिळवला. पेरंबूर आणि तिरुचिरापल्ली (पूर्व). मात्र, नियमांनुसार पक्षाच्या एकूण ताकदीत एकाच जागेची गणना केली जाते. त्यामुळे टीव्हीकेची प्रभावी ताकद १०७ वर येते आणि बहुमतासाठी अजून ११ आमदारांची गरज आहे.
राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात विजय यांनी स्पष्टपणे सरकार स्थापनेसाठी आमंत्रण देण्याची विनंती केली असून, बहुमत सिद्ध करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. आता राज्यपाल यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, टीव्हीके इतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी हालचाली करत असल्याची माहिती आहे. विशेषतः AIADMK किंवा DMK मधील काही आमदारांना आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर विजय यांच्या निवासस्थानाबाहेरही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. नीलांकरई परिसरात १०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले असून, परिसरात प्रवेश करण्यासाठी कडक तपासणी केली जात आहे.
पुढील टप्प्यात टीव्हीकेचे निवडून आलेले १०८ आमदार इतर पक्षांसोबत चर्चा करून सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. राज्यपालांचा निर्णय आणि पुढील राजकीय घडामोडी यावर तामिळनाडूमध्ये सत्ता कोणाची येणार हे ठरणार आहे.