

चेन्नई; वृत्तसंस्था : अभिनेता-राजकारणी विजय थलपती यांच्या ‘टीव्हीके’ पक्षाने रविवारी मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. दंडपाणी यांच्यासमोर अर्ज करून करूर येथे 27 सप्टेंबर रोजी पक्षाच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची सीबीआय किंवा विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी केली आहे. या दुर्घटनेत 40 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. टीव्हीकेच्या वकिलांच्या गटाने न्यायमूर्तींच्या निवासस्थानी धाव घेत ही मागणी केली. पर्यायी मागणी म्हणून त्यांनी या घटनेची स्वतःहून (सुमोटो) दखल घेण्याची विनंती न्यायालयाला केली.
टीव्हीके पक्षाचे पदाधिकारी निर्मल कुमार यांच्या माहितीनुसार, न्यायमूर्तींनी वकिलांना मदुराई खंडपीठात याचिका दाखल करण्यास सांगितले असून, त्यावर सोमवारी दुपारी 2.15 वाजता सुनावणी होणार आहे.
उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टालिन यांनी विदेश दौरा अर्धवट सोडून करूरला भेट दिली. त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आणि जखमींवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयांमध्ये भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी निवृत्त न्यायमूर्ती अरुणा जगदीशन यांच्या नेतृत्वाखालील आयोगाची घोषणा केली असून, आयोग आज करूर येथे तपास सुरू करेल. आयोगाच्या अहवालानुसार मुख्यमंत्री एम. के. स्टालिन योग्य ती कारवाई करतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीमधून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. तसेच, या दुर्दैवी घटनेच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती अरुणा जगदीशन यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय आयोग नेमण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
चेन्नई : अभिनेता आणि तामिळगा वेट्री कझगम (टीव्हीके) पक्षाचे अध्यक्ष विजय यांनी करूर येथील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रत्येकाला त्यांनी 2 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे.