

नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा:
भारतात सतत होणारे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ले म्हणजे इस्लामिक दहशतवाद आहे, असे अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी म्हटले आहे. हा दहशतवाद भारत आणि अमेरिकेसह अनेक मध्यपूर्वेतील देशांसाठी धोका बनत असल्याचे त्या म्हणाल्या. रायसीना संवादात सहभागी होण्यासाठी भारतात आलेल्या तुलसी गबार्ड आणि केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची देखील भेट झाली. या भेटीदरम्यान राजनाथ सिंह यांनी, खलिस्तानी समर्थक पन्नुच्या शीख फॉर जस्टिस या संघटनेवर कठोर कारवाई करण्याची मागणी तुलसी यांच्याकडे केल्याचे सूत्रांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, मला भारत खूप आवडतो. मी जेव्हा जेव्हा इथे येते तेव्हा मला माझ्या स्वतःच्या घरी आल्यासारखे वाटते. येथील लोक खूप दयाळू आणि स्वागतशील आहेत. येथील जेवण नेहमीच चविष्ट असते. दाल मखनी आणि ताज्या पनीरने बनवलेले सर्व पदार्थ चविष्ट असतात, असे त्या म्हणाल्या.
तुलसी म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इस्लामिक दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या त्यांच्या वचनाबद्दल अगदी स्पष्ट आहेत. या दहशतीने आपल्याला वेढले आहे आणि अमेरिकन लोकांना अजूनही धोका देत आहे. याचा परिणाम भारत, बांगलादेशमधील लोकांवर होत आहे आणि सध्या सीरिया, इस्रायल आणि मध्य पूर्वेतील अनेक देशांमधील लोकांवर होत आहे. मला माहित आहे की पंतप्रधान मोदी याला गांभीर्याने घेतात. दोन्ही नेते या धोक्याची ओळख पटवून त्यांना पराभूत करण्यासाठी एकत्र काम करतील, असे त्या म्हणाल्या.
खलिस्तानी संघटना "शिख फॉर जस्टिस" वर अमेरिकेने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभाग संचालक तुलसी गबार्ड यांच्यासोबतच्या बैठकीत केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. दिलीमध्ये राजनाथ सिंह आणि तुलसी यांची भेट झाली. या भेटीविषयी राजनाथ सिंह यांनी 'एक्स'वर पोस्ट करून माहिती दिली आहे. तुलसी गबार्ड यांना नवी दिल्लीत भेटून आनंद झाला. भारत-अमेरिका भागीदारी आणखी दृढ करण्याच्या उद्देशाने आम्ही संरक्षण आणि माहितीची देवाणघेवाण यासारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा केली, असे सिंह यांनी म्हटले आहे. या बैठकीत शिख फॉर जस्टिस विषयी देखील चर्चा झाल्याचे समजते. या खलिस्तानी संघटनेला भारताने बेकायदेशीर संघटना म्हणून अगोदरच घोषित केले आहे. बैठकीत भारताने संघटनेविषयी चिंता व्यक्त केली आणि अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालकांना या बेकायदेशीर संघटनेविरुद्ध कठोर कारवाई करण्यास सांगितले.