नवी दिल्ली; वृत्तसंस्था : सर्जियो गोर यांची भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती होणे, ही केवळ एका राजनैतिक अधिकार्याची बदली नसून, वॉशिंग्टनच्या बदलत्या परराष्ट्र धोरणाचे महत्त्वाचे संकेत आहेत. अवघ्या 38 व्या वर्षी या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान होणारे गोर नेमके कोण आहेत आणि त्यांच्याकडून भारताला काय अपेक्षा आहेत, याचा हा आढावा.
सर्जियो गोर यांचा जन्म रशियाच्या (सोव्हिएत युनियन) ताश्कंदमध्ये झाला. एका स्थलांतरित तरुणाने अमेरिकेत जाऊन तिथल्या सत्तेच्या सर्वोच्च केंद्रस्थानी (व्हाईट हाऊस) स्थान मिळवणे, हा प्रवास स्वप्नवत आहे. त्यांनी जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले आणि लवकरच रिपब्लिकन पक्षाच्या वर्तुळात आपली ओळख निर्माण केली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत विश्वासू सहकार्यांच्या यादीत त्यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. ट्रम्प यांच्या दुसर्या कार्यकाळासाठी प्रशासकीय अधिकार्यांची निवड करणार्या व्हाईट हाऊस प्रेसिडेन्शिअल पर्सनल ऑफिसचे संचालक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. यावरूनच त्यांचा प्रशासकीय अनुभव आणि राजकीय वजन स्पष्ट होते.
भारतासाठी विशेष दूत का महत्त्वाचे?
गोर यांच्याकडे केवळ भारताचे राजदूत पदच नाही, तर दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांचे विशेष दूत म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे.
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि मध्य आशियातील वाढता रशिया-चीनचा प्रभाव पाहता, गोर यांची भूमिका निर्णायक ठरेल. गोर हे ट्रम्प यांचे निकटवर्तीय असल्याने, नवी दिल्लीचा संदेश थेट ओव्हल ऑफिसपर्यंत (राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय) पोहोचवणे अधिक सोपे होणार आहे.
‘ही’ आहेत सर्जियो गोर यांच्यासमोरील आव्हाने
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील व्यक्तिगत मैत्री सर्वश्रुत आहे. मात्र, सर्जियो गोर यांच्यासमोर काही व्यापारविषयक पेच आहेत :
1. व्यापार आणि टॅरिफ : ट्रम्प प्रशासनाचे अमेरिका फर्स्ट धोरण आणि भारताचे मेक इन इंडिया यामध्ये शुल्कावरून अनेकदा खटके उडतात. हे वाद सोडवणे गोर यांच्यासाठी मोठे आव्हान असेल.
2. संरक्षण करार : प्रिडेटर ड्रोन असो वा जेट इंजिनचे तंत्रज्ञान, भारताला अमेरिकेकडून मोठी अपेक्षा आहे.
3. व्हिसा धोरण : आयटी क्षेत्रातील भारतीयांसाठी एचवन-बी व्हिसाचे नियम सुलभ ठेवण्यासाठी गोर यांच्यावर भारतीय मुत्सद्यांचा दबाव असेल.
गोर भारतात दाखल; दिल्लीत स्वीकारली जबाबदारी
नवी दिल्ली : अमेरिकेचे नवनियुक्त राजदूत सर्जियो गोर अधिकृतरीत्या आपली जबाबदारी स्वीकारण्यासाठी नुकतेच नवी दिल्लीत दाखल झाले. वॉशिंग्टनच्या द़ृष्टीने अत्यंत धोरणात्मक मानल्या जाणार्या या पदावर त्यांची नियुक्ती अशावेळी झाली आहे, जेव्हा भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील संबंध संधी आणि आव्हाने अशा दोन्ही वळणांवरून जात आहेत.
भारतात आगमन होताच गोर यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आपला उत्साह व्यक्त केला. ‘भारतात पुन्हा परतणे खूप छान वाटते आहे. आपल्या दोन्ही राष्ट्रांपुढे भविष्यात उत्तम संधी आहेत’, असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे द्विपक्षीय संबंधांबाबत सकारात्मक संकेत मिळत आहेत.
तरुण आणि अनुभवी नेतृत्व
अवघ्या 38 वर्षांचे सर्जियो गोर हे गेल्या काही दशकांतील भारतातील सर्वात तरुण अमेरिकन राजदूत ठरले आहेत. त्यांची नियुक्ती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असून, नोव्हेंबरमध्ये सिनेटने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. राजदूत पदासोबतच त्यांच्याकडे दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठीचे अमेरिकेचे विशेष दूत म्हणूनही अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून वॉशिंग्टनसाठी या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित होते.