

इटानगर; वृत्तसंस्था : अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेजवळील हयुलियांग-चागलागाम रस्त्यावर एक मोठा अपघात झाला. 21 मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रक खोल दरीत कोसळला. अंजावचे उपायुक्त मिलो कोजिन यांच्या माहितीनुसार, या अपघातात किमान 22 मजुरांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. हा अपघात 10,000 फुटांपेक्षा जास्त उंचीवर, आंतरराष्ट्रीय सीमेपासून सुमारे 45 किमी अंतरावर असलेल्या चागलागाम सीमा रस्त्यावर झाला.
अपघातानंतर अनेक बळी वाहनातच अडकून पडले होते, तर काही जण ट्रक दरीत कोसळत असताना बाहेर फेकले गेले. एका पीडित व्यक्तीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या चेहर्याची हाडे फ्रॅक्चर झाली आहेत. त्याला बाहेर काढून उपचारासाठी आसामला हलवण्यात येत आहे. दरम्यान, इतर 21 पीडितांसाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आसाम पोलिसांशी समन्वय साधला जात आहे.