पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीकडे ( Delhi polls) संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. आम आदमी पार्टीसाठी अस्तित्वाची तर भाजप आणि काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरली आहे. इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याने काँग्रेस आणि आप आमने-सामने आहेत. मात्र इंडिया आघाडीतील तृणमूल काँग्रेसने आम आदमी पार्टीला पाठिंबा दिला. याबद्दल केजरीवालांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानले आहेत. ( Trinamool supports AAP in Delhi polls)
दिल्ली विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने आम आदमी पक्षाला पाठिंबा जाहीर केला आहे, असे आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी आज (दि. ७) सांगितले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आभार मानताना केजरीवाल म्हणाले की, "धन्यवाद दीदी", त्यांनी नेहमीच 'आप'ला पाठिंबा दिला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी X पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "तृणमूल काँग्रेसने दिल्ली निवडणुकीत आपला पाठिंबा जाहीर केला आहे. मी वैयक्तिकरित्या ममता दीदींचा आभारी आहे. धन्यवाद दीदी. तुम्ही आमच्या चांगल्या आणि वाईट काळात आम्हाला नेहमीच पाठिंबा दिला आणि आशीर्वाद दिला."
तृणमूलने आपला पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी इंडिया आघाडीतील समाजवादी पार्टी आणि शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांनीही केजरीवालांना पाठिंबा जाहीर केला होता. २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती केल्यानंतर आपने आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला होता.
सत्ताधारी आपने २०१५ आणि २०२०च्या निवडणुकीत अनुक्रमे ६७ आणि ६२ जागांसह विजय मिळवला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत हॅट्ट्रिक करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. ७० सदस्यीय दिल्ली विधानसभेसाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे आणि 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे.