

नवी दिल्ली: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संसद भवन संकुलातील प्रेरणा स्थळ येथील पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. तसेच केंद्रीय मंत्री, खासदार, माजी खासदार आणि इतर मान्यवरांनीही आदरांजली वाहिली.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यातील खासदारांनी त्यांना अभिवादन केले. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला खासदार वर्षा गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव, प्रशांत पडोळे, श्यामकुमार बर्वे, शिवाजी काळगे, कल्याण काळे, नामदेव कीरसान, भास्कर भगरे, अमर काळे, संजय देशमुख आदी खासदारांनी अभिवादन केले.