

नवी दिल्ली ः राष्ट्रपती भवनाचे आकर्षण कोणाला नाही... दुर्गम भागातील डोंगराळ अन् जंगलातील काट्याकुट्यातून वाट चोखाळणार्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रपतींची ‘थेट भेट’ ही तर जणू पर्वणीच... अशी पर्वणी घडवून आणलीय दैनिक ‘पुढारी’ने. महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांतील दुर्गम भागात वास्तव्य करणार्या स्पर्धा परीक्षेतून प्रावीण्य संपादन केलेल्या प्रज्ञावंत 24 आदिवासी विद्यार्थ्यांनी भारताच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्याशी 9 डिसेंबर रोजी थेट संवाद साधला. महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी झालेली ही ग्रेट भेट या विद्यार्थ्यांना अतीव आनंद देणारी अविस्मरणीय ठरली.
महाराष्ट्राच्या विविध दुर्गम भागातील ‘पुढारी’ टॅलेंट सर्च परीक्षेत प्रावीण्य संपादन केलेल्या 24 आदिवासी विद्यार्थ्यांचे महामहिम राष्ट्रपतींना प्रत्यक्ष भेटण्याचे स्वप्न सोमवारी पूर्ण झाले. आदिवासी विकास विभाग नाशिक आयुक्त कार्यालय व दैनिक ‘पुढारी’ टॅलेंट सर्च या अभियानामधून आदिवासी विभागामधील नाशिक, धुळे, कळवण, यावल, नंदुरबार व राजूर या विभागातील 24 हजार विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या ‘पुढारी’ टॅलेंट सर्च परीक्षेत विशेष प्रावीण्य संपादन करणार्या 24 आदिवासी विद्यार्थ्यांच्या राष्ट्रपती भेटीचा उपक्रम यंदा राबविण्यात आला.
दैनिक ‘पुढारी’चे चेअरमन आणि समूह संपादक डॉ. योगेश जाधव आणि संचालिका डॉ. स्मितादेवी जाधव यांनी सर्वप्रथम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पुष्पगुच्छ देऊन पुढारी समूहाच्या वतीने स्वागत केले. यावेळी नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार उपस्थित होते. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आईने स्वतः तयार केलेले नक्षीदार वस्त्र प्रेमाची भेट म्हणून द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आले. काही विद्यार्थ्यांनी बळीराजाचे प्रतीक म्हणून सोबत आणलेला बैलगाडा राष्ट्रपतींना भेट म्हणून देण्यात आला. नंदुरबार प्रकल्पाच्या वतीने विठ्ठलमूर्तीचे पेंटिंग राष्ट्रपतींना भेट देण्यात आले. राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रदीप गवळी या विद्यार्थ्याने काढलेले पेंटिंग मुर्मू यांना भेट देण्यात आले.
यावेळी राष्ट्रपती भवनातील जनजाती संग्रहालयचे दर्शन घेत असताना आदिवासी संस्कृतीचे दर्शन झाले. या संग्रहालयामध्ये आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व पाहून विद्यार्थी भारावून गेले. या संग्रहालयात वारली कला व गोंडी या कलेचे प्रदर्शन पाहण्यास मिळाले. येथे मांडलेल्या चित्रप्रदर्शनाच्या फोटो पेंटिंगमध्ये आदिवासी समाजातील महिला, शेतकरी, वनवासी या सर्वांची प्रतिनिधित्व चित्रे पाहून मुलांना आपला समाज जणू राष्ट्रपती भवनात अवतरलाच आहे, असे वाटले. यामधून मुलांची राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागली.
राष्ट्रपती भवनातील खानपानापासून पर्यटनापर्यंत पाहुण्यांच्या भेटीपासून ध्वजवंदनापर्यंत काय काय व्यवस्था असते याची इत्थंभूत माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. राष्ट्रपती भवनातील सर्व माजी राष्ट्रपतींचे तैलचित्र पाहण्याची संधी मुलांना मिळाली. याशिवाय इतिहासातील अनेक पाने, अनेक दस्तऐवज, अनेक जुने फोटो यांचेसुद्धा दर्शन मुलांना या माध्यमातून झाले. त्यामुळे अत्यंत अविस्मरणीय आणि आनंददायी भेटीमुळे प्रफुल्लित झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांनी परतीच्या प्रवासात दैनिक ‘पुढारी’ला धन्यवाद दिले. पुढारी टॅलेंट सर्चच्या माध्यमातून आदिवासी समाजातील पाड्यावरील मुलांना ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुलांनी कृतज्ञता व्यक्त केली. हा दौरा यशस्वी होण्यासाठी आदिवासी विभाग, नाशिकचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत व उपायुक्त सुदर्शन नागरे यांनी प्रारंभापासून विद्यार्थ्यांशी चर्चा करून, शिक्षकांना मार्गदर्शन करून सहकार्य केले. राजूर प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे, नाशिक प्रकल्पाधिकारी अर्पित चव्हाण, धुळे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, नंदुरबार प्रकल्पाधिकारी चंद्रकांत पवार, यावल प्रकल्पाधिकारी अरुण पवार, कळवण प्रकल्प अधिकारी आकुनरी नरेश यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
आयुष्यात पहिल्यांदाच आदिवासी विद्यार्थ्यांनी दिल्ली ते नाशिक असा विमान प्रवासाचा आनंद घेतला. उंच आकाशात गगनभरारी घेणार्या विमानातून दोन तास प्रवास करताना विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता. शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये विमान प्रवासाचे कुतूहल दिसून आले. विमानातून केलेला प्रवास त्यांच्यासाठी संस्मरणीय अनमोल ठेवा ठरला आहे.
या भेटीत राष्ट्रपती मुर्मू यांनीही आदिवासी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “विद्यार्थ्यांनी डॉक्टर, इंजिनिअर, शास्त्रज्ञ आदी क्षेत्रांत यशाची शिखरे पादाक्रांत केली. मानव चंद्रावर पोहोचलाच आहे. तुम्ही ‘पुढारी’ टॅलेंट सर्चच्या माध्यमातून टॅलेंटेड बनला आहात. आता तुम्ही या ज्ञानसाधनेच्या माध्यमातून सूर्यालाही गवसणी घालण्याची संधी घ्या.” राष्ट्रपतींच्या या आवाहनाला मुलांनीही हसून दाद दिली. मुलांशी संवाद साधल्यानंतर मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या माहितीचे पुस्तक व चॉकलेट भेट दिले. राष्ट्रपतींनी सर्व अतिथींना राष्ट्रपती भवनाची माहिती घ्या, राष्ट्रपती भवनाचा अभ्यास करून घ्या, असा आग्रह केला.
नाशिकच्या बांधकाम क्षेत्रातील प्रख्यात दीपक बिल्डर्सचे व्यवस्थापकीय संचालक दीपक चंदे यांचे सामाजिक कार्य सर्वज्ञात आहे. दैनिक ‘पुढारी’द्वारे जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांची राष्ट्रपती भेट उपक्रमास व्यापक सहकार्य करून चंदे यांनी सामाजिक बांधिलकी अधोरेखित केली आहे. व्यावसायिक साधनेला दातृत्वाची जोड देण्याच्या त्यांच्या द़ृष्टिकोनाची नाशिकच्या सामाजिक जगतात नेहमीच दखल घेतली जाते. दैनिक ‘पुढारी’च्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमात चंदे यांनी स्वयंप्रेरणेने पुढे येत सहकार्याचा हात दिला आहे.