

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shashi Tharoor - Jay Panda selfi | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, तिरूअनंतपुरमचे खासदार शशी थरूर यांची गेल्या काही दिवसांत भाजपशी जवळीक वाढत असल्याचे दिसून येत आहे. युक्रेन-रशिया युद्धाबाबत बोलताना पंतप्रधान मोदी हे पुतीन आणि झेलेन्स्की या दोघांनाही मिठी मारू शकतात, अशा शब्दात त्यांनी मोदींचे कौतूक केले होते. आता एका भाजप नेत्याने सोशल मीडियात केलेल्या सूचक पोस्टमुळे खा. थरूर हे भाजपच्या मार्गावर आहेत का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात पडला आहे.
भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत 'जय' पांडा यांनी काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्यासोबतचा एक सेल्फी सोशल मीडियात शेअर केला आहे. पांडा यांनी कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "आम्ही अखेर एकाच दिशेने प्रवास करत आहोत." त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वतुर्ळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. (Shashi Tharoor - Jay Panda selfi)
पांडा यांनी X (माजी ट्विटर) वर पोस्टमध्ये म्हटले आहे की, "माझ्या मित्राने आणि सहप्रवाशाने मला खोडसाळ म्हटले, कारण मी म्हटले की, आम्ही अखेर एकाच दिशेने प्रवास करत आहोत." दरम्यान, त्यावर खा. थरूर यांनी तत्काळ उत्तर देत स्पष्ट केले की, ते फक्त भुवनेश्वरपर्यंतचेच सहप्रवासी आहेत! थरूर यांनी म्हटले आहे की, "फक्त भुवनेश्वरपर्यंतचा सहप्रवासी! मी उद्या सकाळी कलिंगा लिट फेस्टमध्ये भाषण देणार आहे आणि त्यानंतर लगेच परत येणार आहे."
गेल्या काही दिवसांत खा. थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणांची प्रशंसा केली आणि भाजप नेत्यांसोबत सेल्फी घेतल्यामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात थरूर यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबतचा एक सेल्फी पोस्ट केला आणि ब्रिटनसोबतच्या मुक्त व्यापार करार (FTA) पुनरुज्जीवनासाठी केंद्र सरकारचे कौतुक केले होते. त्यांनी मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीचेही समर्थन केले, कारण त्यातून अनेक महत्त्वाचे मुद्दे सोडवले गेले. याशिवाय, थरूर यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोदींच्या 'तटस्थ' भूमिकेची प्रशंसा केली आणि पूर्वी या धोरणावर टीका केल्याबद्दल "मी चूक केली, आता पश्चात्ताप करत आहे," असे कबूल केले होते.
थरूर यांच्या या विधानांवर भाजपने काँग्रेसवर टीका करत "यामुळे राहुल गांधी यांना लाज वाटेल," असे म्हटले होते. दरम्यान, थरूर यांना काँग्रेसमध्ये डावलले जात असल्याच्या चर्चांनाही जोर आला आहे. गेल्या महिन्यात राहुल गांधी यांनी दिल्लीतील एका बंद दाराआडच्या बैठकीत थरूर यांच्याशी चर्चा केली होती. थरूर यांनी भाजपमध्ये जाण्याची शक्यता फेटाळली असली, तरी त्यांनी "माझ्याकडे इतरही पर्याय आहेत", असे सूचित केले आहे.