

ठळक मुद्दे
१ जानेवारीपासून सुधारित मानके सर्व उत्पादकांना लागू
सर्वोच्च प्राधान्यक्रमाचा विषय म्हणून पाहण्याची राज्यांना सूचना
औषध कंपन्यांची होणार कधीही तपासणी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
विषारी कफ सिरपमुळे अलीकडेच मोठ्या प्रमाणात बालकांचे मृत्यू झाले होते. या प्रकारानंतर देशातील औषध उत्पादक कंपन्यांना जागतिक उत्पादन मानके पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंपन्यांनी ही प्रक्रिया जानेवारीपर्यंत पूर्ण करावी. त्यापुढे त्यांना कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, असे भारताच्या औषध नियामकांनी स्पष्ट केले आहे.
विषारी कफ सिरपमुळे सप्टेंबरमध्ये 24 बालके दगावली. यामुळे हादरून गेलेल्या यंत्रणांनी सर्व उत्पादक कंपन्यांची झाडाझडती घेतली. काही कंपन्यांच्या संचालकांवर कारवाई करण्यात आली. औषध कंपन्यांनी जागतिक मानकांचे पालन करण्यासाठी कंपन्यांना याआधीही सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत देण्यात आली होती.
मोठ्या औषध कंपन्यांनी जून 2024 ची अंतिम मुदत पूर्ण केली, तर लहान उत्पादकांना डिसेंबर 2025 पर्यंतची मुदत पूर्वीच्या मुदतवाढीचा भाग म्हणून देण्यात आली. या उद्योग गटांनी आणखी मुदतवाढ मागितली होती. कारण हे निकष पूर्ण करण्यासाठी मोठा खर्च असल्यामुळे लहान व्यवसायांचे दिवाळे निघू शकते. परंतु मध्य प्रदेशात 24 मुलांचा दूषित सिरपने मृत्यू झाल्याची गंभीर बाब समोर आल्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेत मुदतवाढ देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
कोणत्याही परिस्थितीत डिसेंबर आधी जागतिक निकष पूर्ण करून ते 1 जानेवारीपासून लागू करण्याचे आदेश दिले. तपासणीदरम्यान कोणत्याही उत्पादक कंपनीने सुधारित शेड्यूल एमनुसार अंमलबजावणी केली नसल्याचे आढळून आल्यास कठोर कारवाई सुरू केली जाईल, असा इशारा ड्रग्ज कंट्रोलर जनरल राजीव सिंग रघुवंशी यांनी दिलेल्या आदेशात दिला आहे. ज्या कंपन्या मुदतवाढ निकषांतर्गत येत नाहीत त्यांची त्वरित तपासणी करावी, असे सूचनेत म्हटले आहे.
या निकषांची अंमलबजावणी होते की नाही ते तपासण्याची जबाबदारी राज्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की, 'शेड्यूल एम' अंतर्गत सुधारित मानके 1 जानेवारीपासून सर्व उत्पादकांना लागू होतील. राज्य नियामकांना तपासणी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.