
नवी दिल्ली : मंडईतील भाव घसरल्याने टोमॅटोचे किरकोळ भाव कमी झाले आहेत. देशात १४ नोव्हेंबर रोजी टोमॅटोची प्रति किलो सरासरी किरकोळ किंमत ५२ रूपये ३५ पैसे होती. तर एक महिन्यापूर्वी हिच किंमत ६७ रूपये ५० पैसे होती. म्हणजे प्रति किलो दरात २२.४ टक्क्यांनी घसरण झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारचा ग्राहक व्यवहार विभागाने रविवारी (दि.१७) दिली.
आझादपूर मंडईत टोमॅटोची आवक वाढली असून किंमती जवळपास ५० टक्क्यांनी घसरल्या आहेत. मागच्या महिन्यात ५ हजार ८८३ रुपयांना एक क्विंटल टोमॅटो मिळत होता. आता एक क्विंटल टोमॅटोची किंमत २ हजार ९६९ रुपये आहे, अशी माहितीही ग्राहक व्यवहार विभागाने दिली.
कृषी विभागाच्या अंदाजानुसार २०२३-२४ या वर्षांत टोमॅटोचे एकूण वार्षिक उत्पादन २१३.२० लाख टन झाले आहे. जे २०२२-२३ मध्ये २०४.२५ लाख टन होते. म्हणजे टोमॅटो उत्पादनात ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये टोमॅटोच्या किमतीत वाढ झाली त्याचे कारण आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये जास्त आणि दीर्घकाळ पडलेल्या पाऊस होता, असे ग्राहक व्यवहार विभागाने सांगितले. मदनपल्ले आणि कोलार येथील टोमॅटोच्या प्रमुख केंद्रांवर आवक कमी झाली असली तरी, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या राज्यांमधील हंगामी आवक यामुळे देशभरातील पुरवठ्यातील तफावत भरून निघाली आहे, असेही ग्राहक व्यवहार विभागाने नमूद केले.