

Medical Negligence Case : कन्नूरमधील पाय्यानूर येथील एका खासगी रुग्णालयात ओठावरील जखमेच्या उपचारासाठी भूल (ॲनेस्थेशिया) देण्यात आलेल्या दीड वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच बालकाला जीव गमवावा लागल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी पाय्यानूर पोलिसांनी 'बेबी मेमोरियल हॉस्पिटल'च्या भूलतज्ज्ञ डॉ. अंजली पोडुवाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कन्नूर येथील एरामम-कुट्टूरचे रहिवासी असलेले टी. सूरज आणि विजीषा यांचा देवांश शौर्य हा एकुलता एक मुलगा होता. तो ५ जुलै रोजी घराबाहेर खेळताना पडला. त्याच्या ओठाला मोठी जखम झाली. मथामंगलम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले.त्यानंतर त्याला पय्यानूर येथील 'बेबी मेमोरियल हॉस्पिटल'मध्ये हलवण्यात आले. तिथे त्याला भूल (ॲनेस्थेशिया) देऊन ओठाला टाके घालण्यात आले.
या प्रकरणी कुटुंबीयांनी डॉक्टर अंजली पोदुवाल यांच्यावर वैद्यकीय निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम १२५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या कलमान्वये दोषी आढळल्यास कमाल तीन महिन्यांच्या कारावासाची तरतूद आहे.
'बेबी मेमोरियल हॉस्पिटल'ने वैद्यकीय निष्काळजीपणाचे सर्व आरोप फेटाळले आहेत. रुग्णालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "बालकाला ॲनेस्थेशिया दिल्यानंतर लगेचच त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्याला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आणि पुढील उच्च उपचारांसाठी कन्नूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले.भूल देण्याचे योग्य प्रमाण आणि वैद्यकीय काळजी घेऊनही ॲनेस्थेशियानंतर काही वेळा अशा अनपेक्षित गुंतागुंती निर्माण होऊ शकतात, असे सांगत रुग्णालयाने उपचाराच्या सर्व स्वीकृत नियमांचे पालन केले असल्याचा दावा केला आहे. तसेच बालकाचा जीव वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात आले होते, असेही रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.