वाराणसी : वृत्तसंस्था
तिरुपती बालाजी मंदिराच्या श्रीवरी लाडूत गाय आणि डुकराची चरबी आढळल्यानंतर देशभरात प्रशासन सतर्क झाले असून, देशातील प्रमुख मंदिरांतून प्रसादाचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. विविध प्रयोगशाळांतून या नमुन्यांच्या वैज्ञानिक तपासणीला सुरुवातही झाली आहे. तिरुपतीच्या लाडवांची धग उत्तर प्रदेशात सर्वाधिक पसरली आहे. एफएसडीए (अन्नसुरक्षा व औषध प्रशासन विभाग) अलर्ट मोडवर आहे. वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरासह लखनौतील प्रसिद्ध धार्मिक स्थळांवरही प्रसादाची तपासणी सुरू झालेली आहे.
तिरुपतीप्रमाणेच काशी विश्वनाथ मंदिरातही प्रसाद म्हणून लाडूच तयार केले जातात. हे लाडूही चौकशीच्या फेर्यात अडकलेले आहेत. मंदिराचे प्रशासकीय अधिकारी शंभू शरण सिंह हे स्वत: गुणवत्ता तपासणीसाठी लाडू तयार होतात त्या कक्षात धडकले आणि नमुने घेतले. सिंह यांनी नमुन्यांची अधूनमधून पण नियमितपणे तपासणी सुरू राहायला हवी, असे निर्देशही दिले आहेत.लखनौमध्येही विविध मंदिरांतून विक्री होणार्या प्रसादाची तपासणी सुरू झाली आहे. सहायक आयुक्त विजय प्रताप सिंह यांनी स्वत: विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या व तपासणीचे निर्देश दिले. हनुमंत धाममधील प्रसादाचे नमुने अन्नसुरक्षा विभागाच्या चमूने तपासणीसाठी घेतले.
अखिल भारतीय तीर्थ पुरोहित महासभेने वृंदावनातील मंदिरांच्या प्रसादाची तपासणी करण्याची मागणी उत्स्फूर्तपणे केली आहे. तिरुपती बालाजीतील मंदिरात भेसळ होऊ शकते तर तसे देशात कुठल्याही मंदिरात घडू शकते, असे महासभेचे म्हणणे आहे. लगतच्या उत्तराखंड, मध्य प्रदेशसह देशभरातील विविध राज्यांतील प्रसिद्ध मंदिरांतूनही त्या त्या ठिकाणी प्रशासनाने प्रसादाचे नमुने तपासणीला घेतले आहेत.