पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील राव आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात अचानक पाणी घुसल्याने तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. आणखी बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध सुरु आहे. सध्या एनडीआरएफच्या पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे. दिल्ली सरकारने या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. दिल्लीत नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसानंतर आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचले होते. पाण्याने भरलेल्या तळघरात बुडून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाला आहे. बचाव मोहिमेचा एक भाग म्हणून तळघरात भरलेले पाणी पंपांच्या सहाय्याने काढले जात गेले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी भरल्याने तीन विद्यार्थीनी अडकल्याची माहिती दिल्ली अग्निशमन विभागाला सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. सुरुवातीला तळघरात पाणी साचल्याने दोन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची बातमी होती, तर एक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती. या घटनेमुळे संतप्त झालेले विद्यार्थी व पालक दिल्ली महापालिका आणि आप विरोधात आंदोलन करत आहेत.
दिल्ली अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग यांनी सांगितले की, आम्हाला संध्याकाळी 7.15 वाजता घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन विभागाच्या पाच गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या होत्या. शोधकार्यादरम्यान दोन विद्यार्थिनींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. एकूण तीन विद्यार्थी पाण्यात अडकल्याची माहिती मिळाली होती. त्यापैकी दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बचावकार्याच्या शेवटी तिसऱ्या मुलीचा मृतदेह सापडला. घटनेच्या वेळी तळघरात 30 विद्यार्थी होते, त्यापैकी तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे.
घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, लायब्ररी 7 वाजण्याच्या सुमारास बंद होते. यावेळी सुमारे 30 विद्यार्थी उपस्थित होते. आम्हाला बाहेर पडण्यास सांगण्यात आले. दरम्यान, सर्व विद्यार्थी तळघरातून बाहेर पडत होते. मात्र पाणी इतके वेगाने आले की काही विद्यार्थी अडकले आणि दोन ते तीन मिनिटांत संपूर्ण तळघर तुडुंब भरले. पावसाचे पाणी इतके घाण होते की खाली काहीच दिसत नव्हते. शासनाने घालून दिलेल्या नियम आणि अटींनुसार कोणत्याही कोचिंग सेंटर आणि लायब्ररीच्या इमारतींचे बांधकाम झालेले नाही. अपघातस्थळी बचावकार्यासाठी कोणत्याही प्रकारची अतिरिक्त जागा नाही. याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीमध्ये बाहेर जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नसल्यामुळे अशा घटना या भागात घडत आहेत.