

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्रात प्रवाशांना आता अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. इंडिगोसारख्या कंपन्यांच्या मक्तेदारीवरून सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने तीन नवीन विमान कंपन्यांना भारतात सेवा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला आहे. यामुळे स्पर्धेत वाढ होऊन प्रवाशांना स्वस्त दरात प्रवास मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या आठवड्यात अल हिंद एअर आणि फ्लाय एक्स्प्रेस या दोन कंपन्यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले आहे. यापूर्वीच शंख एअर या कंपनीला आवश्यक मंजुरी मिळाली होती. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील उडान योजनेमुळे प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने या तिन्ही कंपन्यांकडून त्यांच्या कार्यपद्धतीचा आराखडा मागवला आहे. यामध्ये त्या कोणत्या मार्गांवर विमाने चालवणार आहेत आणि त्यांच्या ताफ्यात कोणती विमाने असतील, याची सविस्तर माहिती विचारण्यात आली आहे.
तीन नवीन कंपन्या : शंख एअर, अल हिंद एअर आणि फ्लायएक्स्प्रेस लवकरच भारतीय आकाशात झेप घेतील.
सरकारी पाठबळ: नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या आठवड्यात नवीन कंपन्यांना आवश्यक एनओसी प्रदान केली आहे.
मक्तेदारीला लगाम : नवीन कंपन्यांच्या प्रवेशामुळे देशांतर्गत विमान वाहतुकीतील इंडिगोची मक्तेदारी कमी होण्यास मदत होईल.