पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात शुक्रवारी (दि.1) संध्याकाळी फटाके फोडताना लागलेल्या आगीत तीन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. उलुबेरिया येथे काही मुले फटाके फोडत असताना फटाक्याची ठिणगी शेजारी ठेवलेल्या फटाक्यांवर पडली, त्यामुळे एका घराला आग लागली. त्या आगीत तीन मुलांचा होरपळून मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितले की, मुलांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेची माहिती मिळताच दोन अग्नीशमनची वाहने आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी पोहचली होती. मृतांमध्ये तानिया मिस्त्री (वय.11), इशान धारा (वय.3) आणि मुमताज खातून (वय.5) यांचा समावेश आहे. या अपघातात मनीषा खातून यांच्यासह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आग लागल्यानंतर ती तीन मुले घराबाहेर पडू शकली नाहीत. दरम्यान, आग लागल्यानंतर शेजाऱ्यांनी घरातून बादल्यांनी पाणी ओतण्यास सुरुवात केली. मात्र आगीवर नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. आग पसरू लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली तोपर्यंत सर्व काही संपले होते. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिन्ही मुलांना मृत घोषित केले. दोघांवर गंभीर अवस्थेत उलुबेरिया मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत.
स्थानिक लोकांनी सांगितले की, त्या घरात मोठ्या प्रमाणात फटाके ठेवण्यात आले होते, त्यामुळे आग वेगाने पसरली. आग लगतच्या दुकानातही पसरली आहे. त्या घरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांचा साठा का करण्यात आला होता, याचाही तपास पोलीस करत आहेत. उलुबेरिया घटनेवर राज्यमंत्री पुलक रॉय म्हणाले की, 'ही अत्यंत दुःखद घटना आहे. आम्ही सर्व कुटुंबासोबत आहोत. जळालेल्या व्यक्तीला चांगल्या उपचारासाठी कोलकाता येथे पाठवण्यात आले आहे. हावडा ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक स्वाती बंगालिया यांनी सांगितले की, स्पार्कलर पेटवताना तीन मुलांचा जळून मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेची चौकशी केली जाईल.