

वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी घेतल्या जाणार्या NEET-UG 24 परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज (दि.१८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. 'एनटीए'ने NEET-UG 2024 परीक्षेत विद्यार्थ्यांनी मिळवलेले गुण त्यांच्या वेबसाइटवर विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवावी आणि शहर व केंद्रानुसार निकाल स्वतंत्रपणे जाहीर करावा. तसेच बिहार पोलिसांनी आपल्या तपास अहवालाची प्रत सादर करावी, असे निर्देश देत या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवार, २२ जुलै राेजी होईल, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. दरम्यान, आजच्या सुनावणीत पेपरफुटी व्यापक प्रमाणावर झाली असेल तरच फेरपरीक्षा हाेईल, असा पुन्नरुच्चार सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी केला.
परीक्षेमध्ये झालेले गैरप्रकार हे स्थानिक स्वरुपाचे आहेत, असा दावा करत पुन्हा नीट परीक्षा घेण्याच्या मागणीला केंद्र सरकारसह नॅशनल टेस्टिंग एजन्सी ( एनटीए)ने ८ जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान विरोध केला हाेता. यावेळी नीट परीक्षेतील गैरप्रकाराबाबत केंद्र सरकार आणि NTA ने १० जुलैपर्यंत शपथपत्र दाखल करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. एनटीएने 17 जुलै रोजी न्यायालयात सादर केलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, परीक्षेत पद्धतशीर अनियमितता असल्याचा याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्णपणे चुकीचा आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सीबीआयने या प्रकरणी न्यायालयात तपास अहवाल सादर करायचा होता. त्याची एक प्रत आम्हाला मिळावी, अशी मागणी मुख्य याचिकाकर्त्याचे ज्येष्ठ वकील नरेंद्र हुड्डा यांनी केली. यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणी सीबीआयने तपासातील तपशील उघड केला तर तपासात अडथळा येईल.
यावेळी सरन्यायाधीशांनी याचिकाकर्त्यांना किमान किती गुण मिळाले आहेत? असा सवाल केला. यावर १ लाख ८ हजार उमेदवारांना प्रवेश मिळाला आहे. यामध्ये समावेश नसणार्या १३१ विद्यार्थींनी पुनर्परीक्षेची मागणी केली आहे. १ लाख ८ हजारांमध्ये समावेश असणार्या २५४ विद्यार्थी फेरपरीक्षेला विरोध करत आहेत, अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार यांनी दिली.
आयआयटी मद्रासने नीट परीक्षेबाबत सादर केला अहवाल विश्लेषण नाही. कारण वैद्यकीय शाखेत प्रवेश घेणाऱ्या १ लाख आठ हजार उमेदवारांवर आधारित विश्लेषणे व्हायला हवे हाेते. यंदाच्या नीट परीक्षेत अतिरिक्त गुण दिले आहेत. पेपरफुटी झाली आहे हेही मान्य करण्यात आले आहे. यासंदर्भात आयआयटी मद्रासने दिेला डेटाही खूपच मोठा आहे. 23 लाख उमेदवारांच्या डेटामध्ये फेराफेरी कशी झाली हे स्पष्ट होत नाही, असा दावा ॲड.हुड्डा यांनी यावेळी केला.
'एनटीए'ने नीटच्या निकालाचे शहरनिहाय आणि केंद्रनिहाय विश्लेषण केले आहे. यासाठी मद्रास 'आयआयटी'चे चेअरमनने प्रोफेसर गोपालकृष्णन यांची नियुक्ती केली होती. येथे कोणत्याही अनियमिततेचा प्रश्नच उद्भवत नाही, असा दावा केंद्र सरकारच्या वतीने युक्तीवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला. मेहता यांनी १०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा तक्ता सादर केला. यामध्ये केवळ १७ उमेदवारांची नावे असल्याचे ॲड.हुड्डा यांनी सांगितले.
नीट २०२४ या परीक्षेत गुंटरचा उमेदवार टॉपर आहे, अशी माहिती सॉलिसिटर जनरल यांनी दिली. यावर जयपूरमधील ९ उमेदवार असून, या उमेदवारांचा आयआयटी मद्रास अहवालात समावेश केलेला नाही, असा दावा ॲड. हुड्डा यांनी केला. या अहवालाचा एकमेव उद्देश आहे की, टॉपर्स देशभरातील आहेत आणि कोणत्याही एका शहराचे किंवा केंद्राचे नाहीत;पण या परीक्षेत बहादुरगडमधील हरदयाल शाळेची एक खास गोष्ट आहे. येथील सहा उमेदवारांना पैकीच्या पैकी गुण आहेत. बहादूरगडमध्ये जे घडले ते भयावह आहे. संपूर्ण देशात एसबीआयमधून पेपर दिला जात होता, मात्र हरदयाल स्कूलमध्ये कॅनरा बँकेतून पेपर दिला जात होता. विद्यार्थ्यांना कॅनरा बँकेचा पेपर करण्याची परवानगी द्यावी, अशा सूचना होत्या, असे प्राचार्य सांगतात. 'एनटीए'ने कॅनरा बँकेतून घेतलेल्या प्रश्नपत्रिकेचे वितरण कसे झाले हे कधीही उघड केले नाही. त्यांनी एसबीआय आणि कॅनरा बँकेतून प्रश्नपत्रिका जमा केल्याची नोंद शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नोंदीमध्ये आहे. येथील शाळेतील प्रत्येकाला ग्रेस मार्क्स देण्यात आले आहेत. ग्रेस गुणांमुळे 6 जणांना 720/720 गुण मिळाले, तर एकाच केंद्रातील दोन जणांना 718 गुण मिळाले, अशी माहितीही ॲड. हुड्डा यांनी यावेळी खंडपीठाला दिली.
यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी स्पष्ट केले की, "आम्ही नीट परीक्षा निकाला टॉप १०० उमेदवाराचा अहवाल पाहिला आहे. या परीक्षेत प्रथम आलेले पहिले 100 रँकर्स हे 12 राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशामधील आहेत. फेरपरीक्षा दिलेल्या १५६३ उमेदवारांपैकी किती जण पहिल्या १०० मध्ये येतात हे पाहावे लागेल, यासंदर्भात आम्हाला NTA माहिती देईल." यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, या परीक्षेत पहिले १०० उमेदवार हे १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत. यामध्ये ५६शहरांमधील ९५ परीक्षा केंद्रांवरुन परीक्षा दिलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. यावर सरन्यायाधीशांनी पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या ६७ विद्यार्थ्यांबद्दल सांगा, असा आदेश दिला यावर पैकीच्या पैकी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पुनर्तपासणीनंतर कमी झाल्याचे सॉलीसीटर जनरल यांनी स्पष्ट केले. यावेळी 'एनटीए'ने सांगितले की, NCERT पुस्तकांमधील बदलांमुळे 44 विद्यार्थ्यांना ग्रेस गुण मिळाले. फेरपरीक्षेनंतर टॉपर्सची संख्या ६७ वरून ६१ वर आली. ऑल इंडिया रँक 1 वर फक्त 17 विद्यार्थी आहेत.
गेल्या वर्षीच्या तुलनेत टॉपर्सच्या संख्येत कोणतीही वाढ न झाल्यामुळे आयआयटी मद्रासच्या अहवालातील चार्टमध्ये जयपूरचा समावेश करण्यात आलेला नाही, असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले.
एनटीएने दावा केला आहे की यंदा अभ्यासक्रमात कपात करण्यात आली होती. तर यंदा अभ्यासक्रमात वाढ झाली होती. यासंदर्भात कागदपत्रे माझ्याकडे आहेत. यंदा 550-720 गुण असणार्या उमेदवारांची संख्या मागील वर्षांच्या तुलनेत पाच पटीने वाढली आहेत, असे ॲड हुड्डा यांनी सांगितले. यावर सरन्यायाधीशांनी पेपरफुटी झाल्याने असे झाले का, असा सवाल केला तेव्हा हा धोक्याचा इशारा असल्याचे ॲड. हुड्डा यांनी सांगितले.
नीट परीक्षेची पेपरफुटी व्यापक प्रमाणावर झाली आहे, असा तुमचा तर्क आहे का, असा सवाल सरन्यायाधीशांनी याचिकाकतृर्यांच्या वकिलांना केला. यावर हुड्डा म्हणाले की, परीक्षेच्या आधी सहा दिवस हे पेपर्स एक खाजगी कूरियर कपनीच्या हातात आहेत. प्रश्नपत्रीका हजारीबागमध्ये एक ई-रिक्षा मध्ये गेला. बॅकेत जाण्याऐवजी ई-रिक्षा चालक शाळेमध्ये गेला. ईरिक्षावर पेपर लिहिण्यात आलेले फोटो आहेत. यानंतर हे पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाले. सोशल मीडियाचे स्वरुप पाहता. लीक झालेल्या पेपर्सच्या प्रसार आणि लाभार्थी अचूकपणे ओळखणे अशक्य आहे. तसेच याबाबत एनटीएने आपल्या अहवालात कोणताही खुलासा केलेले नाही. यावर सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले की, नीटचे पेपरफुटी करणारे केवळ पैशासाठी हे करत होते. ज्यांना पैसे कमवायचे होते ते मोठ्या प्रमाणावर पेपर प्रसारित होणार नाहीत.
टेलिग्रामच्या चॅनेलवर हे पेपर कधी पोस्ट केले गेले, असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. टेलिग्रामच्या व्हिडिओमध्ये छेडछाड करण्यात आली होती. ते संपादित केले होते, असे एनटीएने सांगितले.
यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, "नीट परीक्षा ५ मे रोजी झाली. याचा अर्थ ५ मेपूर्वी पेपर फुटले असतील. जर ४ मेच्या रात्री पेपर फुटी झाली की त्यापूर्वी हा प्रश्न आहेच. यामध्ये दोन शक्यता आहेत, एक बँकांनी पेपर ताब्यात घेण्यापूर्वीच एक पेपर फुटला असावा किवा हे सर्व ३ मे पूर्वी घडले असावे. किंवा दुसरी शक्यता अशीही आहे की, पेपर हे बँकांमधून बाहेर पडले आणि परीक्षा केंद्राकडे गेले तेव्हा पेपर फुटला असावा." असे मानले की, तुमच्या मते विद्यार्थ्यांना सकाळी 10.15 वाजता पेपर मिळाले. यामध्ये 180 प्रश्न आहेत. 9.30 ते 10.15 च्या दरम्यान प्रश्न सोडविणारे आहेत. 45 मिनिटांत ते विद्यार्थ्यांना देणे शक्य आहे का? 7 सॉल्व्हर होते आणि त्यांनी प्रत्येकी 25 विद्यार्थ्यांना विभागले. संपूर्ण पेपर ४५ मिनिटांमध्ये सोडवला गेला आणि विद्यार्थ्यांना देण्यात आला ही सर्व गृहीतके फारच दूरची आहेत, असे निरीक्षणही सरन्यायाधीशांनी नोंदवले.
प्रश्न असा आहे की पेपर कधी फुटला? पेपर फुटीच्या दोन शक्यता आहेत. एक पेपर बँकांच्या ताब्यात येण्यापूर्वी म्हणजेच ३ मे पूर्वी किंवा बँकांमधून परीक्षा केंद्रावर पाठवले जात असताना. तुमच्या मते पेपर केव्हा फुटला असा सवाल सरन्यायाधीशांनी सॉलिसिटर जनरल यांना केला. यावर त्यांनी पेपरफुटी झालेली नाही, असा दावा केला. तसेच विशिष्ट केंद्रात त्रुटी झाली. सकाळी ८.०२ ते ९.२३ या काळात एक व्यक्ती एका केंद्रावर आतज जाते पेपरचे फोटे घेते आणि बाहेर येते, असाही दावा सॉलीसीटर जनरल मेहता यांनी केला.
यावर सॉलिसिटर जनरल मेहता म्हणाले की, पेपरफुटी झाली असे मानले तरी विद्यार्थ्यांना प्रश्न लक्षात ठेवण्यासाठी फक्त 2 तास मिळाले. त्यामुळे 18 विद्यार्थ्यांपैकी केवळ एका विद्यार्थ्यालाच प्रवेश मिळण्याची शक्यता आहे, मात्र त्याला नामुष्कीला सामोरे जावे लागणार आहे. संपूर्ण परीक्षा प्रक्रियेत अशा विद्यार्थ्यांची एकूण संख्या १५०च्या पुढे जाणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
चिंता करण्यासारखी गोष्ट म्हणजे, नीट परीक्षा पेपरफुटी आणि परीक्षा यामधील कालावधी किती होता? जर कालावधी 3 दिवस असेल तर साहजिकच मोठा धोका आहे, असेही सरन्यायाधीशांनी यावेळी स्पष्ट केले.
बिहारमधील हजारीबाग आणि पाटणा येथे पेपरफुटीचा प्रकार घडला आहे हे मान्य आहे. आम्हाला जाणून घ्यायचे आहे की या केंद्रावरील किती विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले आहेत. यावर एनटीएने स्पष्ट केले की, हजारीबाग आणि पाटणा येथील ८० उमेदवार वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत, असे एनटीएने खंडपीठास सांगितले.
५ मे २०२४ रोजी नीट परीक्षा झाली. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर झाला.
तब्बल ६७ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण. तर काहींना ७२० पैकी ७१८, ७१९ गुण मिळाले. हरियाणाच्या एकाच केंद्रातील ६ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. यामुळे परीक्षेतील अनियमिततेबद्दल शंका निर्माण झाली.६७ विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात आल्यानेच पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचा आरोप करण्यात आला.
NTA ने 8 जून रोजी वाढीव गुणांच्या चौकशी करण्यासाठी समिती स्थापन.
परीक्षेनंतर आठ दिवसांनी पेपरफुटीच्या चौकशीसाठी पहिली याचिका दाखल.
बिहार पोलिसांनी ५ मे रोजी पेपरफुटीच्या संशयावरून १३ जणांना अटक केली. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) परीक्षेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ६ मे रोजी पेपर फुटल्याचा आरोप फेटाळला.
NEET उमेदवार शिवांगी मिश्रा यांनी 13 मे रोजी पेपर फुटीच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल.
१३ जून रोजी १,५६३ उमेदवारांना देण्यात आलेले ग्रेस गुण रद्द.
13 जून रोजी, NTA ने 1563 अतिरिक्त गुणांसह उमेदवारांसाठी पुन्हा परीक्षा आयोजित करण्याची घोषणा केली. त्यापैकी 813 उमेदवार परीक्षेला बसले तर 750 उमेदवार परीक्षेला बसले नाहीत.
NTA ने 23 जून रोजी झालेल्या फेरपरीक्षेचा निकाल जारी केल्यानंतर 1 जुलै रोजी सुधारित गुणवत्ता यादीही जाहीर केली होती.या परीक्षेनंतर पैकीच्या पैकी गुण मिळवणार्या ६७ उमेदवारांची संख्या ६१ वर आली आहे.
८ जुलै रोजी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्ट केले होते की, " नीट परीक्षेचा पेपर फुटला असल्याचे स्पष्ट झाले. फेरपरीक्षेबाबत निर्णय किती व्यापक आहे हे जाणून घेतल्यावरच घेतला जाऊ शकतो.
अशा अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून न्यायालय NEET परीक्षेच्या 'पावित्र्या'बद्दल काळजीत आहे. याची चौकशी करण्यासाठी सरकारने तज्ज्ञांची समिती स्थापन केली असेल, तर त्याचा सविस्तर अहवाल सादर करावा."
११ जुलै : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जेबी परडीवाला, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठाने NEET-UG 2024 प्रकरणांची सुनावणी तहकूब केली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी गुरुवार, १८ जुलै राेजी हाेणार असल्याचे स्पष्ट केले हाेते.