

नवी दिल्ली : देशातील शांतता उध्वस्त करणे, मंदिर मशिदीच्या नावावर लोकांमध्ये सातत्याने वाद पेटवणे हाच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकारचा अजेंडा आहे, अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर केली. तसेच जर वक्फ विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले तर देशातील मुसलमान तेलगू देसम पक्षाचे चंद्रबाबू नायडू, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान आणि जदयुचे नितेश कुमार यांना माफ करणार नाहीत, असेही खासदार ओवैसी म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट वक्फ संशोधन विधेयकाचा विरोध करतो. कुठल्याही परिस्थितीत आम्हाला हे विधेयक मान्य नसल्याचे खासदार डॉ. फौजिया खान म्हणाल्या.
राजधानी दिल्लीत मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने वक्फ संशोधन विधेयकाच्या विरुद्ध धरणे प्रदर्शन करण्यात आले. जंतर मंतर येथे आयोजित या धरणे प्रदर्शनात एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवैसी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी कायदामंत्री सलमान खुर्शीद, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खा. डॉ. फौजिया खान, काँग्रेस खा. गौरव गोगोई, कम्युनिस्ट पक्षाचे खा. राजाराम सिंह, बिजू जनता दलाचे खा. मुजीबुल्ला खान आणि अन्य विरोधी पक्षांचेही अनेक खासदार तसेच मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. ओवैसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, दिल्ली शहरात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाची जागा आहे मात्र ती जागा सरकारची असल्याचे सांगितले जाते. हे विधेयक अस्तित्वात आल्यास अशा सर्व ठिकाणी सरकार ताबा घेईल आणि संबंधित जागा वक्फ बोर्डाची नाही, असे सांगितले जाईल. मुस्लिम लोकांकडून मशिद, दर्गा काढून टाकणे हाच या विधेयकाचा उद्देश आहे, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी चंद्रबाबू नायडू, चिराग पासवान आणि नितेश कुमार यांनाही आवागन केले. या नाजूक वेळी तुम्ही आमच्या सोबत उभे राहिले नाहीत आणि विधेयकाचे समर्थन केले तर या देशातील मुसलमान तुम्हाला माफ करणार नाहीत. कारण हे विधेयक जर कायदा बनेल तर ते तुमच्या सहकार्याने बनेल, असेही ते म्हणाले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार डॉ. फौजिया खान म्हणाल्या की, आमचा पक्ष वक्फ संशोधन विधेयकाच्या विरोधत आहे. करतो. आपला देश संविधानानुसार चालतो, संविधानाने सर्वांना समान हक्क दिले आहेत. मात्र हे विधेयक असंवैधानिक आहे. कुठल्याही पद्धतीने मुस्लिम समाजाचे हक्क काढून घेतले पाहिजेत, यासाठी केंद्र सरकार जाणीवपूर्वक असे प्रयत्न करत आहे. वक्फमध्ये काही सुधारणा अपेक्षित आहेत मात्र एखादा रुग्ण आजारी असला म्हणून त्याला मारून टाकणे हा न्याय नाही. वक्फ बोर्डाला ताकद देणे गरजेचे असताना वक्फ बोर्डाला संपवण्याचा घाट घातला जात आहे, असेही त्या म्हणाल्या.