

नवी दिल्ली : मराठी साहित्य इतर भाषांमध्ये अनुवादित व्हायला हवे. त्यासाठी शासनाने अनुवाद अकादमीची स्थापना करायला हवी, अशा भावना ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादामध्ये उमटल्या. संमेलनाच्या शेवटच्या दिवशी, रविवारी छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीतील यशवंतराव चव्हाण सभा मंडपामध्ये "अनुवाद मराठीतून इतर भाषेत किंवा इतर भाषेतून मराठीत" या विषयावर परिसंवाद पार पडला. यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार, डॉ. पृथ्वीराज तोर, सुनिता डागा, दीपक बोरगावे आणि विजय नाईक या मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या.
साहित्यकृतीचा अनुवाद करणे म्हणजे केवळ शब्दांचे एका भाषेतून दुसऱ्या भाषेत भाषांतर करणे नव्हे. तर भावना महत्त्वाच्या आहेत, असे कार्यक्रमात सुरुवातीला दीपक बोरगावे म्हणाले. इंग्रजीतून मराठीत जेवढे अनुवाद झाले. तेवढे मराठीतून इंग्रजीत झाले नाहीत, अशी खंत दीपक बोरगावे यांनी व्यक्त केली. शुद्ध अशुद्ध भाषा नसते ती एकमेकांत मिसळून असते. इंग्रजी आणि इतर भाषांतून अनेक शब्द मराठीत आले आहेत. भाषा ही संस्कृती संक्रमणाची गोष्ट आहे, असे दीपक बोरगावे म्हणाले.
जगामध्ये सर्वात जास्त अनुवाद बायबलचा ३५०० भाषेत झाला आहे. भगवद्गीतेचे भाषांतर ८० भाषेत झाले. तर रामायण ४८ भाषेमध्ये अनुवादित झाले आहे, असे विजय नाईक म्हणाले. जागतिकीकरणात अनुवादाचा मोठा वाटा असल्याच्या भावना सुनीता डागा यांनी व्यक्त केल्या.
बहुभाषिकता हे भारतीय समाजाचे लक्षण आहे. एक भाषिकता असलेला समाज तुरुंग असतो तर अनुवाद या तुरुंगाचा दरवाजा किंवा खिडकी असते. यातून स्वच्छ हवा येऊन आतले वातावरण चांगले होते, असे पृथ्वीराज तोर म्हणाले. भाषेला ज्ञानभाषा करण्याचे काम अनुवादातून होते असे ते म्हणाले.
ताराबाईंचे सद्यस्थितीच्या मराठी साहित्या विषयाचे विधान म्हणजे समकालीन लेखकांवर अन्याय आहे. त्यांनी मराठीतील सद्यस्थितीचे लेखक आणि त्यांचे साहित्य पाहिले पाहिजे वाचले पाहिजे. मराठीत आज काय लिहिले जात आहे हे संमेलनाच्या अध्यक्षांना माहीत असावे असे ते म्हणाले. दरम्यान, डॉ. तारा भवाळकर एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, ‘सद्यस्थितीला मराठीमध्ये दर्जेदार साहित्य लिखाण होत नाही’. त्यावर मी बोललो असे तोर म्हणाले.
दोन भाषा एकत्र येणे म्हणजे दोन संस्कृती आणि दोन समाज एकत्र येणे. आचरणची विचारांची देवाण-घेवाण होणं हे काम अनुवादातून होतं असे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार म्हणाले. मूळ साहित्यकृती वाचकाला जो अनुभव देते तोच अनुभव अनुवादातील साहित्याने देखील दिला पाहिजे असे अनुवादित साहित्य तयार व्हावे असे ते म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. यातून मिळणाऱ्या निधीमधून अनुवादासाठी एक शिस्त असलेली प्रक्रिया तयार व्हावी. त्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र अनुवाद अकादमी स्थापन केली पाहिजे. यातून मराठी भाषेतील साहित्य इतर भाषेत जावे, तुकोबांचे अभंग जगभरात पोहोचवायचे. तर हे काम कोण करणार? शासकीय पातळीवर व्यवस्था निर्माण व्हायला हवी. अनुवादाकरिता मूलभूत काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक संमेलनात अनुवादाचा विषय असावा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. तर अनुवाद अकादमीची स्थापना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या संदर्भात पावले उचलली असल्याचे पृथ्वीराज तोर यांनी सांगितले.