पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'एक पेड माँ के नाम' या मोहिमेत केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सहभाग घेतला. दिल्लीतील आयुष भवन येथे त्यांनी त्यांच्या मातोश्री स्व. सिंधुताई गणपतराव जाधव यांच्या नावाने आवळ्याचे झाड लावले. यानंतर बोलताना ‘एक पेड माँ के नाम’ हे अभियान पर्यावरण रक्षणासाठी महत्त्वाचे पाऊल असल्याचे मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले. 'एक पेड माँ के नाम' या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल. तसेच या मोहिमेतून माता आणि मातृभूमीबद्दल आदर व्यक्त होतो. त्यामुळे या मोहिमेत सहभागी होऊन लोकांना त्यांच्या आई आणि मातृभुमीसाठी काहीतरी विशेष केल्यासारखे वाटेल.
मंत्री प्रतापराव जाधव यांनी देशभरातील लोकांना या मोहिमेचा भाग बनून आपल्या सभोवताली औषधी वनस्पती लावा आणि त्याचा सेल्फी आणि सोशल मीडियावर शेअर करा, असे आवाहन यावेळी केले. या मोहिमेत आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाची प्रमुख भूमिका आहे. या मंडळाने या मोहिमेसाठी सर्वसामान्यांना प्रोत्साहित करण्यासाठी काही सहज उपलब्ध असलेल्या औषधी वनस्पतींची नावेही सार्वजनिक केली आहेत. वृक्षारोपण कार्यक्रमाला मंत्र्यांसह आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेश दधिची आणि मंत्रालयातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या अभियानांतर्गत सर्व आयुष संस्थांच्या संचालकांनी आणि प्रमुखांनी आपापल्या संस्थांमध्ये औषधी वनस्पतींचेही रोपण केले.