

श्रीनगर : नियंत्रण रेषेपलीकडील ‘लाँच पॅड’वर दहशतवादी काश्मीर खोर्यात घुसखोरी करण्याच्या संधीच्या प्रतीक्षेत असले, तरी भारतीय सीमा सुरक्षा दल पूर्णपणे सज्ज आणि सतर्क आहे. हिवाळ्यापूर्वी घुसखोरीचे सर्व प्रयत्न हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दलाने कंबर कसली आहे, अशी माहिती दलाच्या एका वरिष्ठ अधिकार्याने शनिवारी दिली.
सीमा सुरक्षा दलाच्या काश्मीर फ्रंटियरचे महानिरीक्षक अशोक यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, बर्फवृष्टी होण्यापूर्वी दहशतवादी खोर्यात घुसखोरीचे प्रयत्न नेहमीच वाढवतात. ते म्हणाले, बर्फवृष्टी होण्यापूर्वी घुसखोरीचे प्रयत्न नेहमीच होतात. अजून सुमारे दोन महिने (नोव्हेंबरपर्यंत) शिल्लक आहेत आणि या काळात घुसखोरी होण्याची शक्यता जास्त आहे. कारण, त्यानंतर पुढील सहा महिने त्यांना संधी मिळणार नाही. ते नेहमीच घुसखोरीचा प्रयत्न करतात; परंतु आमच्या दलाच्या सतर्कतेमुळे घुसखोरी करणे खूप कठीण आहे.
यादव यांनी पुढे सांगितले की, नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या ‘लाँच पॅड’वर दहशतवादी संधीची वाट पाहत आहेत. बांदीपोरा आणि कुपवाडा सेक्टरमधील आमच्या कार्यक्षेत्राच्या पलीकडे असलेल्या लाँच पॅडवर दहशतवाद्यांची उपस्थिती आहे. ते घुसखोरीची संधी शोधत आहेत; पण सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक आहे. खराब हवामानाचा फायदा घेण्याची ते वाट पाहतात; पण आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आणि सतर्क आहोत, असे यादव म्हणाले.
यादव यांनी स्पष्ट केले की, सैन्य आणि सीमा सुरक्षा दल अत्याधुनिक पाळत ठेवण्याच्या उपकरणांच्या मदतीने नियंत्रण रेषेवर अतिशय प्रभावीपणे नियंत्रण ठेवत आहेत. सैन्यासह आम्ही नियंत्रण रेषेवर उत्तम नियंत्रण ठेवत आहोत. यावर्षी सुरक्षा दलांनी आतापर्यंत घुसखोरीचे दोन प्रयत्न हाणून पाडले आहेत. आम्ही ज्या सतर्कतेने आमचे कर्तव्य बजावतो आणि आमच्याकडील नवीन कार्यप्रणाली व नवीन पाळत ठेवण्याची उपकरणे आहेत, यामुळे आमच्या कार्यक्षेत्रात घुसखोरी करणे दहशतवाद्यांसाठी खूप कठीण आहे.