

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी संघटनांनी सुरक्षा दलांच्या नजरेतून वाचण्यासाठी भरतीची पद्धत बदलली आहे. आतापर्यंत दहशतवादी संबंध असलेल्या लोकांना पसंती दिली जात होती. पण आता गुन्हेगारी किंवा फुटीरतावादी कारवायांची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या उच्चशिक्षित तरुणांना लक्ष्य केले जात आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवादी हँडलर्सनी अवलंबलेली ही नवी रणनीती दोन दशकांपूर्वीच्या कार्यपद्धतीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलच्या तपासात अटक केलेल्या आरोपींमध्ये एक विशिष्ट साम्य आढळले आहे. अटक केलेले डॉ. आदिल राथर, डॉ. मुझफ्फर राथर आणि डॉ. मुजम्मिल गनी यांच्यासह अनेक तरुणांचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी किंवा देशविरोधी कार्यात सहभाग नव्हता. दिल्लीत स्फोट झालेल्या गाडीचा चालक डॉ. उमर नबी याची पार्श्वभूमीही स्वच्छ होती, तसेच त्यांच्या कुटुंबाचाही दहशतवादी संघटनांशी कोणताही संबंध नाही.
पाकिस्तानमधून सक्रिय असलेले हँडलर्स उच्चशिक्षित आणि क्लीन पार्श्वभूमीच्या तरुणांना जाळ्यात ओढत असल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉक्टरांसारखे व्यावसायिक दहशतवादी कार्यात सहभागी होतील, अशी शंका कोणालाही येणार नाही, ज्यामुळे त्यांना सुरुवातीपासूनच एक प्रकारचे कव्हर मिळत होते.
तपासाची दिशा आणि नवी भरती पद्धत
ऑक्टोबर महिन्यात श्रीनगरमध्ये धमक्या देणारे पोस्टर्स आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पहिली अटक करण्यात आली. या आरोपींच्या चौकशीतून माजी पॅरामेडिक आणि आता इमाम असलेला मौलवी इरफान अहमद याला अटक झाली. त्यानेच वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लक्ष्य करून डॉक्टरांना कट्टरपंथी बनवले असावे, असा पोलिसांचा कयास आहे. 2019 नंतर सुरक्षा व्यवस्थेची वाढलेली दक्षता लक्षात घेता, दहशतवादी हँडलर्सनी जुन्या दहशतवादी संबंधांच्या लोकांना पुन्हा संघटित करणे टाळले आहे.