

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ग्राम संरक्षण गटाचे दोन सदस्य ठार झाले आहेत. सुरक्षा दलांना त्यांचे मृतदेह हाती लागलेले नाहीत. दरम्यान, पोलिसांनी व्हिलेज डिफेन्स ग्रुपचे सदस्य नजीर अहमद आणि कुलदीप कुमार यांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली आहे. या घटनेची माहिती वृत्तसंस्था 'एएनआय'ने दिली आहे. नजीर अहमद आणि कुलदीप कुमार अशी मृतांची नावे असून दोघेही ओहली कुंटवारा गावचे रहिवासी आहेत. त्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत.
हे दोघेही जनावरे चरण्यासाठी नजीकच्या जंगल परिसरात गेले होते, मात्र ते परतलेच नाहीत. दरम्यान, जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि त्यांचे वडील फारूख अब्दुल्ला यांनी किश्तवाडमध्ये दोन व्हीडीजी सदस्यांच्या हत्येचा निषेध केला. जम्मू-काश्मीरमध्ये दीर्घकालीन शांतता प्रस्थापित करण्यामध्ये अशा प्रकारच्या रानटी हिंसाचाराचा महत्त्वपूर्ण अडथळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या दुःखाच्या प्रसंगी मृतांच्या कुटुंबियांसोबत त्यांचे विचार आणि प्रार्थना आहेत.
या हत्येची जबाबदारी काश्मीर टायगर्सने घेतली आहे. काश्मीर टायगर्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, व्हीडीजीचे दोन सक्रिय सैनिक कुलदीप कुमार आणि नजीर मुजाहिदीन इस्लामचा पाठलाग करत किश्तवाड भागात पोहोचले. काश्मीरच्या मुजाहिद्दीनांनी प्रथम त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, पण ते त्यांचा पाठलाग थांबले नाहीत आणि जवळ आले. त्यानंतर मुजाहिदीनने त्यांना पकडले आणि दोघांनीही आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली.