

India-Myanmar border : मणिपूरच्या चांडेल जिल्ह्यात आसाम रायफल्सच्या जवानांशी झालेल्या चकमकीत किमान दहा दहशतवादी ठार झाले, अशी माहिती भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने दिली आहे. 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती शेअर करताना, भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने म्हटले आहे की, १४ मे रोजी आसाम रायफल्सच्या एका युनिटने स्पीअर कॉर्प्स अंतर्गत खेंगजोय तहसीलमधील न्यू समताल गावात ही कारवाई सुरू केली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील पाेस्टमध्ये भारतीय लष्कराच्या पूर्व कमांडने म्हटले आहे की, १४ मे रोजी आसाम रायफल्सच्या एका युनिटने स्पीअर कॉर्प्स अंतर्गत खेंगजोय तहसीलमधील न्यू समताल गावात ही कारवाई सुरू केली. हा भाग भारत-म्यानमार आंतरराष्ट्रीय सीमेजवळ आहे, जो अनेकदा दहशतवादी कारवायांचे केंद्र राहिला आहे.
लष्कराच्या पूर्व कमांडने X वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, "स्पीअर कॉर्प्सच्या अंतर्गत आसाम रायफल्स युनिटने १४ मे २०२५ रोजी शोधमोहिम राबवली. सैनिकांनी परिसराला वेढा घातला. संशयित अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल आसाम रायफल्सच्या जवानांनी सयंमाने गोळीबार केला. या चकमकीत १० अतिरेकी ठार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचेही लष्कराने म्हटले आहे. या ऑपरेशनचे वर्णन 'कॅलिब्रेटेड' म्हणजेच नियोजित आणि अचूक असे केले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात आणखी दहशतवादी लपण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम अजूनही सुरू आहे. या कारवाईदरम्यान कोणताही सैनिक जखमी झाल्याचे वृत्त नाही. मणिपूरमध्ये सुरू असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांकडून ही कारवाई एक महत्त्वाचे यश मानले जात आहे.