

Bihar Elelction Tejaswi Yadav :
बिहार निवडणुकीत इंडिया आघाडीत जागा वाटपावरून मतभेद सुरू असतानाच आज पाटणा येथील संयुक्त पत्रकार परिषदेत मोठी घोषणा करण्यात आली. बिहार निवडणुकीत इंडिया आघाडीचा मुख्यमंत्रपदाचा चेहरा म्हणून आरजेडीचे तेजस्वी यादव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गहलोत उपस्थित होते. त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी म्हणून तेजस्वी आणि उपमुख्यमंत्री पदासाठी म्हणून मुकेश सहनी यांच्या नावाची घोषणा केली.
सर्वांचं एकमत झालं आहे
मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीवरून महाआघाडीमध्ये काही तणाव असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र अशोक गेहलोत यांनी बुधवारी पाटणा येथे आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांची भेट घेऊन हा अंतर्गत तिढा यशस्वीरित्या सोडवला. यावेळी त्यांनी "सर्व घटक पक्षांचे एकमत झाले असून, तेजस्वी यादव हेच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील," असे स्पष्ट केले.
काय म्हणाले तेजस्वी?
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषणा झाल्यानंतर तेजस्वी यादव यांनी सर्व घटकपक्षांचे आभार मानले. ते म्हणाले, "आम्हाला बिहार घडवण्याचे काम करायचे आहे. आदरणीय लालूजी, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि सर्व महागठबंधनच्या सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. तुम्ही आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला आम्ही नक्कीच सार्थ ठरवू."
तेजस्वी यादव यांनी सत्ताधारी एनडीएवर टीका करताना म्हटले की, "हे लोक थकून गेले आहेत, त्यांना केवळ सत्तेची भूक आहे. जर आम्हाला तीस महिन्यांची संधी मिळाली, तर जी कामे त्यांनी तीस वर्षांत केली नाहीत, ती आम्ही करून दाखवू."
जन अधिकार पार्टीचे प्रमुख पप्पू यादव यांनी मुख्यमंत्रीपदाच्या पोस्टरवर केवळ तेजस्वी यादव यांचा फोटो असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आणि 'मतदान राहुल गांधींच्या फोटोवरच होईल', असे विधान केले.
बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी या घोषणेनंतर महाआघाडीवर टीका करत, "यांच्यात अजूनही मतभेद सुरू आहेत, हे फक्त कार्यालयात बसून एकजूट दाखवत आहेत. हे लोक सरकार चालवू शकत नाहीत," असे म्हटले.
मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित झाल्यामुळे आता महाआघाडी पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाली आहे.