

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
दिल्लीहून शिमलाला जाणाऱ्या एलायंस एयरच्या फ्लाईट क्रं ९१८२१ च्या पायलटने सोमवारी सकाळी शिमला विमानतळावर लँडिंगच्या आधी विमानाच्या ब्रेक मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती दिली. या विमानात हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री आणि डीजीपी डॉ. अतुल वर्मा यांच्यासह ४४ जण प्रवास करत होते. शिमला विमानतळावरील सुत्रांच्या माहितीनुसार, हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांच्यासह सर्व ४४ प्रवासी सुखरूप आहेत. विमानाला तपासणीसाठी खाली उतरवण्यात आले आहे.
हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी सांगितले की, आम्ही आज सकाळी विमानाने शिमला पोहोचलो. विमानाच्या लँडिंगमध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र एक सर्वसामान्य व्यक्तीसारखे मी इतके सांगू शकतो की, विमान उतरताना ज्या ठिकाणी उतरायला हवे होते ते त्या ठिकाणी उतरले नाही. तर ज्या ठिकाणी रनवे संपतो त्या ठिकाणी हे विमान उतरले. विमान रनवेच्या काठावरून वळून पुन्हा ज्या ठिकाणी त्याला रोखता येणार होते त्या ठिकाणी पोहोचले. विमानाला थांबवण्यासाठी अर्जंट ब्रेक लावण्यात आले. आम्हाला विमानात २०-२५ मिनिटे थांबावे लागले.
विमानाच्या पायलटला तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. ज्यामुळे विमानाच्या लँडिंगवेळी गती कमी झाली नाही. ज्यामुळे पायलटला अचानक आपत्कालिन ब्रेक लावावे लागले. त्यामुळे होणारा अनर्थ टळल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षेच्या कारणास्तव या घटनेनंतर धर्मशाळेसाठी निर्धारित पुढची उड्डाणे रद्द करण्यात आली. एलायंस एयरने अजुनपर्यंत तांत्रिक बिघाडावर कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.