

School teacher buries infant over child policy : मध्य प्रदेशातील ‘दोन अपत्य धोरणा’मुळे नोकरी जाण्याच्या भीतीने एका शासकीय शाळेतील शिक्षकाने आणि त्याच्या पत्नीने आपल्या तीन दिवसांच्या नवजात मुलाला जंगलात नेऊन जिवंत पुरल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, दगडांखाली असलेल्या बालकाचा रडण्याचा आवाज ऐकून गावकऱ्यांनी त्याला बाहेर काढले. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे स्थानिक पोलीसांनी स्पष्ट केले आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, बबलू डांडोलिया (३८) आणि त्याची पत्नी राजकुमारी (२८) या दोघांनी मिळून आपल्या चौथ्या अपत्याचा जन्म झाल्यानंतर तीन दिवसांनी त्याला जंगलात नेऊन जिवंत पुरले. ही धक्कादायक घटना छिंदवाडा जिल्ह्यातील धनोरा तालुक्यातील नंदनवाडी गावात २६ सप्टेंबर रोजी घडली. राजकुमारीने २३ सप्टेंबर रोजी मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर २६ सप्टेंबर रोजी दोघांनी बाळाला दुचाकीवरून जंगलात नेले आणि तिथे दगडांखाली जिवंत पुरले. धक्कादायक म्हणजे, हे प्रकरण उघडकीस आले त्या दिवशीच (मंगळवार, १ ऑक्टोबर) NCRB (नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरो) च्या अहवालात मध्य प्रदेश सलग चौथ्या वर्षी नवजात बालकांना टाकून देण्याच्या घटनांमध्ये देशात आघाडीवर असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांनी सुरुवातीला या दाम्पत्यावर बालकाला टाकून देण्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, बालकाला जिवंत पुरल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता दोघांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्थानिक पोलिसांनी सांगितले की, शिक्षकाने आधीचा तिसरा मुलगा सरकारी नोंदींपासून लपवला होता. मात्र चौथ्या मुलाच्या जन्माची नोंद झाली, तर बबलूची नोकरी जाईल, अशी त्यांना भीती वाटत होती. मध्य प्रदेश सरकारच्या ‘दोन अपत्य धोरणा’नुसार, कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला दोनहून अधिक अपत्य असल्यास तो नोकरीस पात्र राहत नाही.