स्वालिया शिकलगार : पुढारी ऑनलाईन डेस्क
दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेते कमल हासन यांना कोईमतूर दक्षिण विधानसभेतून पराभव स्वीकारावा लागला. त्यांना टक्कर द्यायला काँग्रेसचे एस. जयकुमार आणि भाजपच्या वनाथी श्रीनिवासन रणांगणात उतरले होते. वनाथी भाजप महिला युनिटच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. पण, कमल हासन हे दक्षिणेचा लोकप्रिय चेहरा असूनही भाजपने या जागेवर कमळ फुलवलं. कमल हासन यांच्या पक्षाच्या अजेंड्यांचा आणि ध्येयधोरणांचा येथील लोकमनावर फारसा परिणाम झाला नाही. अखेर वनाथी यांनी हासन यांना पराभूत करून पहिल्यांदाचं ही जागा भाजपला मिळवून दिली.
वनाथी श्रीनिवासन
अभिनयातून राजकारणात प्रवेश केल्यापासून असंख्य तामिळ जनतेचे लक्ष त्यांच्याकडे होते. हासन यांच्या अभिनयाचा पगडा लोकांच्या मनावर होता आणि तो आजही आहे. तसं पाहिलं तर तामिळनाडूच्या राजकारणाला चित्रपटसृष्टीतून आलेल्या कलाकारांचा इतिहास आहे. तामिळनाडूतील राजकारण गेली अनेक दशके चित्रपट अभिनेते, अभिनेत्रींभोवती फिरत आहे. रामस्वामीनायकर, एम. जी रामचंद्रन, एम. करुणानिधी, अण्णा द्रमुकच्या जयललिता हे सर्व नेते चित्रपटातूनचं राजकारणात आले. किंबहुना हे एक समीकरणचं झालं होतं. पण, कमल यांच्या पिछाडीवर जाण्याने या समीकरणाला सध्या ब्रेक लागल्याचं दिसून येतं.
'दक्षिण भारताचे मॅंचेस्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोईमतूरमधील स्थान आपल्याला सहज मिळवता येईल, असे समजून निवडणुकीच्या रिंगणात हासन उतरले होते. परंतु, भाजप उमेदवार वनाथी श्रीनिवासन यांनी त्यांना थोड्या फरकांच्या मतांनी पराभूत केले. वनाथी श्रीनिवासन यांना ५२ हजार ६२७ मते मिळाली. तर कमल हासन यांना ५१ हजार ८७ मते मिळाली. एकीकडे कमल हासन यांना आपल्या स्टारडमच्या आधारे राजकारणाच्य़ा पिचवर चांगल्या स्कोरचा विश्वास होता. पण, जनतेने कौल वनाथी यांना दिला. यामागील एक कारण म्हणजे, कोईमतूरमध्ये वनाथी यांचं दीघर्काळ काम होय.
भ्रष्टाचाराचा मुद्दा
मक्कल नीधि मय्यम (MNM) पक्षाच्य़ा अजेंड्यात कमल हासन यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा हाताळला. पक्षाच्या अजेंड्यात भ्रष्टाचाराचा मुद्दा हाताळून निवडणूक लढवली. त्यांचा दावा होता की, जर त्यांचा पक्ष सत्तेत आला तर तामिळनाडूच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचा अंत होईल. त्यांनी हीदेखील आश्वासने दिले की, पक्ष सत्तेत आल्यानंतर गृहिणींना घराच्या कामकाजासाठी पैसे, सर्व घरांना हाय स्पीड इंटरनेट सेवा आणि शेतकरी कृषी आधारित उद्योगांच्या माध्यमातून उद्योजक बनतील. दारिद्र्य रेषेखालील लोकांना समृद्धी रेषेत आणले जाईल.
कार्यकर्त्य़ांना प्रोत्साहन देणारे पत्र आणि विश्वास
निवडणूक हे शेवट नाही आणि लोकांची कामे कधी संपत नाही. त्यांनी निवडणुकीच्या मतमोजणीच्या आधी आपल्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिले होते. त्यांच्यातील धैर्य, आत्मविश्वासाठी प्रोत्साहन दिले. ते आपल्या पत्रात म्हणाले होते, आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की, निवडणूक हा शेवटचा पयार्य नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की, लोकांच्या कामांचा शेवट कुठेचं नाही. कारण, कामे कधीचं संपत नाही. लोकांची कामे अविरतपणे सुरू राहतात. आम्हाला विश्वास आहे की, या निवडणुकीत लोकांचा विश्वास म्हत्त्वाचा आहे. प्रिय लोक आमची शक्ती आहे. लोकांचं कल्याणचं सवोर्तोपरी महत्त्वाचं आहे. यश असो वा अपयश उत्सव साजरे करू नका. आपल्याला विजय न मिळाल्यास निराश होऊ नका. आपले चांगले कार्य नेहमी अविरतपणे सुरू ठेवा. त्रस्त झालेल्यांना मदत करण्यासाठी आपण शक्य तितके प्रयत्न करायला हवे. मला दररोजच्या घडामोडींवरून दिसतं की, 'चांगले कार्य केल्यानंतर स्वतःचे समाधान होणे आणि त्याचा अभिमान वाटणे, हेच विचार अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. कमल हासन यांनी पत्रात पुढे म्हटले होते की, लोकांसाठी आम्ही लोकांसह मैदानावर उभे राहू.
तामिळनाडूचा इतिहास साक्षीदार
चित्रपटातील त्यांचे अभिनय कौशल्य, अफट यश सर्वश्रृत आहे. त्यामुळे अनेकांना वाटत होतं की, हा अभिनेता राजकारणातील नेता बनेल. तामिळनाडूचा इतिहास हा आहे की, कोणताही मोठा सुपरस्टार तेथील सत्तेचा 'किंग'देखील ठरू शकतो. पण, कुठल्याही पातळीवर राजकीय समीकरणं बदलायला वेळ लागत नाही. गरीब लोकांचे जीवनमान उंचावणे, शेतकऱ्यांना उद्योजक बनवणे, घरांमध्ये इंटरनेट सेवा देणे यांसारख्या असंख्य लोकहितांची ध्येयधोरणे कदाचित लोकांना बोलघेवडेही वाटली असावीत.
चाहत्यांचा भ्रमनिरास
या अभिनेत्याला राजकारणातील नेता म्हणून बघण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. अन्य अभिनेते, राजकारणातील धुरंदरांच्या इतकाच तोलामोलाचा, मोठा पडदा गाजवलेला महानायक कमल हासन राजकीय रणांगण गाजवू शकला नाही, य़ाची खंत मात्र त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.
कोईमतूर दक्षिणमधील मतदार
येथे मुस्लिम मतदारांची संख्याही अधिक आहे. एकूण मतदारांची संख्या २ लाख ५१ हजार ३८९ आहे. यामध्ये पुरुष मतदार १ लाख २५ हजार ४१६ आहे. महिला मतदारांची संख्या १ लाख २५ हजार ९५० आणि ट्रांसजेंडर २३ आहेत. संपूणर् तामिळनाडूमध्ये एकूण ३ हजार ९९८ उमेदवार उभे होते. त्यासाठी ६.२९ कोटी मतदारांनी मतदान केले. एकूण मतदारांपैकी ७१.८१ टक्के मतदारांनी मतदानात सहभाग घेतला.
वाचा – तामिळनाडूमध्ये 'स्टॅलिन'राज
तामिळनाडूच्या राजकारणातील धुरंदर स्टॅलिन
ई. पलानीसामी यांच्या नेतृत्वातील अण्णा द्रमुक यांच्या शासनावर धमाकेदार विजय मिळवत एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील द्रमुकने स्पष्ट बहुमत मिळवलं. अण्णाद्रमुकचा सुफडासाफ करत स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होण्यास सज्ज झाले आहेत.