पुढारी ऑनलाईन डेस्क: भारतातील बहुतांशी भागातून नैऋत्य मान्सूनने माघार घेतली आहे. प्रामुख्याने संपूर्ण ईशान्य भारतातून मान्सून पूर्णपणे माघारी आला आहे. दरम्यान परतीचा मान्सून भारताच्या दक्षिण द्वीपकल्पीय भागात सक्रिय असणार आहे. त्यामुळे आजपासून पुढील तीन दिवस दक्षिणेकडील तमिळनाडूसह केरळ, आंध्र प्रदेश 'या' राज्यांना अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 'या' पार्श्वभूमीवर दक्षिणेकडील राज्यात प्रशासन सतर्कतेच्या मोडवर आले आहे.
चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर, राज्य सरकारने मंगळवारी चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. सोमवारी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याव्यतिरिक्त, सरकारने खाजगी माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना मंगळवार ते शनिवारपर्यंत घरून काम करण्याचा सल्ला देण्यास सांगितले आहे.
देशातील हवामान परिस्थितीबद्दल IMD वरिष्ठ शास्त्रज्ञ सोमा सेन रॉय म्हणतात, पुढील 2-3 दिवसांत, आग्नेय द्वीपकल्पीय भारतात ईशान्य मान्सून सक्रीय होण्याची शक्यता आहे. दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या प्रणालीशी संबंधामुळे मान्सून हा पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज सोमवार (दि.१४), मंगळवार (दि.१५) आणि बुधवार (दि.१६) रोजी केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात पाऊस पडेल, असे देखील आएमडी शास्त्रज्ञ सोमा यांनी म्हटले आहे.