

Suresh Gopi step away from politics :
केंद्रीय राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी राजकारणातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आर्थिक तंगीचं कारण देत ते पुन्हा सिनेमाच्या क्षेत्रात परतणार असल्याचं सांगितलं. सुरेश गोपी हे केरळच्या कन्नूर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी जेव्हापासून आपण मंत्री झालो आहेत त्यांचे उत्पन्न हे तळात पोहचलं आहे असं सांगितलं. याबाबतचं वृत्त एएनआयने दिलं आहे.
केरळमधील कार्यक्रमादरम्यान बोलताना सुरेश गोपी म्हणाले, 'मला अभिनय क्षेत्रातील काम सुरू ठेवायचंय. मला आता जास्त कमवलं पाहिजे. माझं उत्पन्न बंदच झालं आहे.' गोपी यांनी त्यांच्या केंद्रीय मंत्रीपदासाठी राज्यसभेचे खासदार सदानंदन मास्टर यांच नाव सुचवलं आहे. ते म्हणाले, 'मी कधीही मंत्रीपदासाठी प्रार्थना केली नव्हती. निवडणूक झाल्यानंतर मी पत्रकारांना सांगितलं होतं की मला मंत्री व्हायचं नाही. मला चित्रपटात काम करायचं आहे.'
ते पुढं म्हणाले, 'मी भाजपचं सदस्यत्व २००८ मध्ये घेतलं होतं. त्यानंतर केरळच्या जनतेनं माझ्या स्वरूपात केरळचा पहिला भाजपचा खासदार निवडून दिला. त्यानंतर पार्टीला वाटलं की मला मंत्री केलं पाहिजे.'
गोपी यांनी यापूर्वी देखील आपलं राज्यमंत्रीपद सोडण्याचा मानस बोलून दाखवलं होता. गोपी यांनी २०१६ मध्ये भाजपं जॉईन केलं होतं. त्यानंतर त्यांना त्याच वर्षी राज्य सभेत खासदार करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना २०१९ आणि २०२१ मध्ये लोकसभेचं तिकीटही देण्यात आलं. मात्र त्यांचा पराभव झाला. अखेर २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्रिशूर लोकसभा मतदार संघातून निवडून आले. त्यांनी सीपीआयच्या व्हीएस सुनिल कुमार यांचा ७४ हजारापेक्षा जास्त मतांनी पराभव केला.