Supriya Sule |‘एनडीएसोबत जाण्यासाठी ना त्यांचा मला फोन, ना माझा त्यांना फोन’ : सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा आमच्यासाठी संपला
Supriya Sule |‘एनडीएसोबत जाण्यासाठी ना त्यांचा मला फोन, ना माझा त्यांना फोन’ : सुप्रिया सुळे
Supriya Sule |‘एनडीएसोबत जाण्यासाठी ना त्यांचा मला फोन, ना माझा त्यांना फोन’ : सुप्रिया सुळेPudhari
Published on
Updated on

नवी दिल्ली : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र यावे, ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती. ती पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न होते. मात्र, दुसऱ्या बाजूने आलेल्या वक्तव्यांवरून त्यांना असे काही करायचे नसल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे आमच्या दृष्टीने हा विषय संपलेला आहे, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तसेच, एनडीएसोबत जाण्यासाठी ना त्यांनी मला फोन केला, ना मी त्यांना फोन केला, असे म्हणत त्यांनी एनडीएसोबत जाण्याच्या चर्चाही फेटाळून लावल्या.

दिल्ली दौऱ्यावर असताना सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, माझे भाऊ अजित पवार आता आपल्यात राहिलेले नाहीत. त्यांना जाऊन पाच महिने झाले आहेत. अजूनही कुटुंब म्हणून आम्ही सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने राहावे आणि देशाची सेवा करावी, ही माझ्या भावाची इच्छा होती. भावाची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मात्र, समोरून येणारी वक्तव्ये पाहता त्यांना तसे वाटत नाही त्यामुळे हा विषय आमच्यासाठी संपलेला आहे, असे म्हणत अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी अजित पवार गट विलीनीकरणासाठी इच्छुक नसल्याचे म्हटले. 

भाजपच्या लोकांच्या भेटीगाठीवर बोलताना त्या म्हणाल्या की, लोकप्रतिनिधी म्हणून जनतेची कामे करण्यासाठी विविध मंत्र्यांची भेट घ्यावी लागते. जेपीसीच्या दौऱ्यावर असताना लखनऊ येथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. अशा अनेक भेटी घ्याव्या लागतात. यापेक्षा या भेटीत काहीही वेगळे नाही, असेही सुळे यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी संविधान संशोधन विधेयकाला विरोध असल्याचे सांगितले. या विधेयकावर आणखी चर्चा होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे मतदारसंघ पुनर्रचना विधेयक अद्याप आलेले नाही. त्यामुळे त्यावर चर्चेचा प्रश्नच उद्भवत नाही. ‘एक देश, एक निवडणूक’ या विषयावर अद्याप चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news