

Parth Pawar Land Deal
नवी दिल्ली : पार्थ पवारांवर माझा पूर्ण विश्वास आहे, ते काहीही चुकीचे करणार नाहीत, असे म्हणत सुप्रिया सुळेंनी पार्थ पवार यांची बाजू घेतली. त्याचवेळी संबंधित जमीन सरकारची होती तर विकली कशी, स्टँप ड्युटी भरली आहे की नाही, सरकार चालवत कोण आहे, निर्णय प्रक्रियेत कोण आहेत, मुख्यमंत्र्यांनी याची नीट उत्तरे दिली पाहिजेत, अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केली.
खा. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. पार्थ पवार संचालक असलेल्या पुण्यातील अमेडिया कंपनीने घेतलेल्या कथित जमीन प्रकरणावर बोलताना त्या म्हणाल्या की, या संदर्भात ज्या बातम्या येत आहेत त्या बघता गोंधळ निर्माण झाले आहे. या प्रकरणात ज्यांचे निलंबन झाले ते तहसीलदार म्हणत आहेत की मी त्यावर सहीच केली नाही. जर त्या तहसीलदारांनी सहीच केली नाही तर कुठल्या आधारावर त्यांचे निलंबन करण्यात आले. कोणाला वाचवण्यासाठी त्यांना निलंबित करण्यात आले का, असा प्रश्नही त्यांनी विचारला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की, आम्ही सदर प्रकरणाची चौकशी करणार आहे. त्यामुळे पारदर्शकपणे याबद्दलची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण सरकारने दिले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, राज्य सरकारमध्ये रोज काही ना काही सुरू आहे. मत चोरीची प्रकरणे समोर येत आहेत, राज्यात रोज गुन्हे वाढत चालले आहेत. सरकार एवढे भक्कम असताना सरकार कोण चालवत आहे, असा प्रश्न पडतो असेही त्या म्हणाल्या.
या संपुर्ण विषयाशी पार्थ पवार यांचा काहीच संबंध नाही. हा सरकारचा विषय आहे. मी पार्थ पवार यांच्याशी सकाळी बोलले. आत्या मी काहीही चूक केलेली नाही, वकील कागदपत्रे घेऊन उत्तर देतील असे पार्थ पवारांनी मला सांगितले. मात्र यामध्ये अजित पवारांचा सहभाग आहे का याबद्दल मला सांगता येणार नाही, असे खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या. या प्रकरणात निलंबित करण्यात आलेल्या तहसीलदारांचे निलंबन मागे घ्या, अशी मागणीही त्यांनी केली.
खा. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सरकार कर्जमाफी करणार आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. "यही समय है, सही समय है" अशा घोषणाही त्यांनी दिल्या होत्या. मात्र ती वेळ नक्की कधी येईल, महादेव मुंडे प्रकरणात त्यांच्या कुटुंबाला योग्य माहिती दिली का जात नाही, फलटण प्रकरणात आतापर्यंत एसआयटी स्थापन का करण्यात आली नाही, सगळ्या गोष्टींची उत्तरे सरकारने द्यावी, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच पार्थ पवार जमीन प्रकरणावर मुख्यमंत्री स्पष्ट बोलत नाहीत. गुंतागुंतीचे संकेत देत आहेत. त्यांनी काय ते एकदा स्पष्ट सांगावे, असेही त्या म्हणाल्या.