

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली कथित मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या (दि.१३ सप्टेंबर )निकाल देणार आहे. या प्रकरणीन्यायमूर्ती सूर्यकांत आणि उज्वल भुयान यांच्या खंडपीठाने ५ सप्टेंबर रोजी निकाल राखून ठेवला होता. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल न्यायालयीन कोठडीत असताना सीबीआयने 26 जून रोजी त्यांना अटक केली होती.
केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर केल्यास ते दिल्लीतील मद्य घोटाळा प्रकरणातील पुराव्याांशी पुराव्यांशी छेडछाड करू शकतात. तसेच तपासात अडथळाही आणू शकतात, असा युक्तीवाद मागील सुनावणीवेळी सीबीआयच्या वतीने करण्यात आला होता. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची याचिका 5 ऑगस्ट रोजी फेटाळली होती. त्यांना जामिनासाठी सत्र न्यायालयात दाद मागण्यास सांगितले होते. सर्वोच्च न्यायालयाने १४ ऑगस्ट रोजी या प्रकरणी सीबीआयची प्रतिक्रिया मागितली होती तसेच जामीन नाकारला होता.
आम आदमी पक्षाच्या (आप) नेत्यांवर काही मद्य विक्रेत्यांच्या लाभासाठी दिल्लीत मद्य धोरणात त्रुटी निर्माण करण्याचा गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप आहे. या घोटाळ्यातून मिळाला पैसा आम आदमी पक्षाने गोवा निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरला, असा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे. या प्रकरणी अरविंद केजरीवाल यांना २६ मार्च २०२४ रोजी ईडीने अटक केली हाेती. ईडी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र या प्रकरणी सीबीआयने केलेल्या कारवाईत केजरीवालांना अद्याप जामीन न मिळालेला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आपचे माजी मीडिया प्रभारी विजय नायर यांना याच प्रकरणात जामीन मंजूर केला आहे. आता उद्या सर्वोच्च न्यायालय कोणता निकाल देणार? याकडे आम आदमी पक्षाचे लक्ष वेधले आहे.
Dehali excise policy scam