

नवी दिल्ली : विषारी कफ सिरपमुळे झालेल्या मुलांच्या मृत्यूची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. वकील विशाल तिवारी यांनी ही याचिका दाखल केली होती.
सरन्यायाधीश बी. आर. गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. कफ सिरपमुळे होणारे मृत्यू वाढत आहेत. अशा भेसळयुक्त औषधाची ही पहिलीच घटना नाही. राज्ये एकमेकांवर दोषारोप करत आहेत. एकाच संस्थेकडून चौकशीची आवश्यकता आहे, असे तिवारी यांनी प्रत्यक्ष हजर राहून खंडपीठाला सांगितले.
सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी याचिकेला विरोध केला. त्यांनी सांगितले की तिवारी वर्तमानपत्रातील बातम्या वाचून न्यायालयात धाव घेतात. त्यांनी म्हटले की संबंधित राज्ये समस्या कमी करण्यासाठी पावले उचलतील. तामिळनाडू, मध्य प्रदेश इत्यादी राज्य या समस्येवर पावले उचलतील, असे तुषार मेहता म्हणाले. त्यानंतर न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.
तिवारी यांच्या याचिकेत भारतातील औषध सुरक्षा यंत्रणेमध्ये संपूर्ण फेरबदल करण्याची मागणी करण्यात आली होती. कफ सिरपमुळे देशामध्ये लहान मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेनुसार, ही दुर्घटना प्रथम छिंदवाडा जिल्ह्यात उघडकीस आली, जिथे सिरप घेतल्यानंतर अनेक मुलांची किडनी निकामी झाली. महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही संशयित प्रकरणे समोर येताच मृतांची संख्या झपाट्याने वाढली.