पुढारी ऑनलाईन डेस्क : माजी मीडिया एक्झिक्युटिव्ह इंद्राणी मुखर्जी यांची परदेशात जाण्याची परवानगी मागण्याची याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. स्वत: ची मुलगी शीना बोरा हिच्या हत्या प्रकरणात मुखर्जी प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणातील खटला जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाला दिले.
मुंबई उच्च न्यायालयाने इंद्राणी मुखर्जी यांना परदेशात जाण्याची परवानगी नाकारली होती. त्यानंतर त्यांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती एमएम सुंदरेश आणि राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने खटल्यातील कार्यवाही एका वर्षाच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश ट्रायल कोर्टाला दिले. परवानगीला विरोध करताना सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की, हा एक संवेदनशील खटला आहे आणि सुनावणी अर्धी झाली आहे. ९६ साक्षीदारांची तपासणी झाली आहे. मुखर्जी यांच्या वकिलाने सांगितले की, त्यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे आणि या प्रकरणात ९२ साक्षीदारांची चौकशी अद्याप बाकी आहे.