

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी यूट्यूबर रणवीर अलाहबादियांना कामानिमित्त परदेशात जाण्यासाठी पोलिसांनी पासपोर्ट परत करावा, असा आदेश दिला. इंडियाज गॉट लॅटेंट यूट्यूब शो दरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आसाम आणि महाराष्ट्र सरकारने त्यांच्याविरुद्धचा तपास पूर्ण झाल्याचे न्यायालयाला सांगितले. यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.
खंडपीठाने अलाहबादिया यांना त्यांचा पासपोर्ट परत घेण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिस ब्युरोशी संपर्क साधण्यास सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने अलाहबादिया यांच्या वतीने उपस्थित असलेले वरिष्ठ वकील अभिनव चंद्रचूड यांना सांगितले की, त्यांच्या अशिलाविरुद्धचे एफआयआर एकत्रित करण्याची आणि पुढील सुनावणीत ते एकाच ठिकाणी आणण्याची त्यांची विनंती विचारात घेतली जाईल.
दरम्यान, १८ फेब्रुवारी रोजी, सर्वोच्च न्यायालयाने अलाहबादिया यांना एका यूट्यूब शो दरम्यान केलेल्या टिप्पण्यांवरून दाखल केलेल्या अनेक एफआयआरमध्ये अटकेपासून संरक्षण दिले होते. त्यांना त्यांचा पासपोर्ट पोलिसांकडे जमा करण्याचे निर्देश दिले होते. ही अट आता शिथील करण्यात आली आहे.