नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाशी संबंधित प्रकरणावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हिंदू पक्षाने ज्ञानवापीशी संबंधित सर्व १५ खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करावेत, जेणेकरून त्यांची एकत्रित सुनावणी होईल, अशी मागणी केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला नोटीस बजावली आहे. मुस्लिम पक्षाला २ आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
ज्ञानवापीशी संबंधित ९ खटले वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात तर ६ खटले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग, वाराणसी यांच्या न्यायालयात सुरू आहेत. गेल्या महिन्यात याचिकाकर्त्या लक्ष्मी देवी आणि अन्य तीन महिलांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी ज्ञानवापीशी संबंधित काही प्रकरणे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग, जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात प्रलंबित असल्याचे म्हटले होते. पुनर्विचार याचिकांसह काही प्रकरणे अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
काही पुनर्विलोकन याचिका जिल्हा न्यायाधीशांसमोरही आहेत, तर जिल्हा न्यायाधीशही मूळ खटल्यांवर सुनावणी करत आहेत. अशा स्थितीत परस्परविरोधी आदेश येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करण्यात यावेत. उच्च न्यायालयाच्या ३ न्यायमूर्तींच्या खंडपीठाने सर्व प्रकरणांची सुनावणी करून निर्णय द्यावा, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे.