

नवी दिल्ली : डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहीम सिंगसह चार जणांना २००२ च्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. २००२ मध्ये डेरा सच्चा सौदाचे माजी व्यवस्थापक रणजीत सिंग यांची हत्या झाली होती. या प्रकरणातील राम रहीम आणि त्याच्या सहआरोपींना दोषमुक्त करण्याच्या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सीबीआयने दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे.
भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने नमूद केले की, या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती बेला. एम. त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठामार्फत सुरू आहे आणि पुढील कार्यवाहीसाठी हे प्रकरण आता त्यांच्या खंडपीठासमोर सूचीबद्ध केले जाईल.
दरम्यान, १० जुलै २००२ रोजी हरियाणाच्या कुरुक्षेत्र येथील खानपूर कॉलनीत रणजीत सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येचे संबंध सिरसा येथील डेराच्या मुख्यालयात गुरमीत राम रहीमने महिलांच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांचा पर्दाफाश करणारे निनावी पत्र प्रसारित करण्याच्या संशयास्पद भूमिकेशी जोडले गेले होते. महिला अनुयायांवर कसे अत्याचार होत आहेत याचे वर्णन करणाऱ्या या पत्रामुळे जनक्षोभ निर्माण झाला होता.
२०२१ मध्ये, पंचकुलातील विशेष सीबीआय न्यायालयाने गुरमीत राम रहीम आणि अवतार सिंग, कृष्ण लाल, जसबीर सिंग आणि सबदिल सिंग यांना हत्येतील भूमिकांसाठी दोषी ठरवले होते. न्यायालयाने पाचही जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि भरीव दंड ठोठावला. त्यानंतर मे २०२४ मध्ये, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सीबीआय न्यायालयाची शिक्षा रद्द केली आणि रणजित सिंग खून खटल्यातील सर्व पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे