

Sonam Wangchuk Case : ख्यातनाम शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या सुटकेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी आज (१५ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयाने २९ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केल्याचे वृत्त ANIने दिले आहे. दरम्यान, वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी २ ऑक्टोबर रोजी संविधानातील कलम ३२ अंतर्गत ‘हॅबियस कॉर्पस’ (बंदी प्रत्यक्षीकरण) याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी पतीला राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत झालेल्या अटकेला आव्हान दिले आहे.
न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन.व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठासमोर सिब्बल यांनी सांगितले की, वांगचुक यांना त्यांचे 'नोट्स' त्यांच्या पत्नीला (वकिलांना देण्यासाठी) देण्याची परवानगी मिळाली नव्हती. "नजरकैदेबद्दल त्यांनी काही 'नोट्स' तयार केले आहेत. त्या त्यांना त्यांच्या पत्नीच्या वकिलांना द्यायचे होते. त्यांनी तयार केलेले कोणतेही 'नोट्स' देण्यास ते पात्र आहेत, वकिलांची मदत घेण्याचा त्यांचा अधिकार आहे. 'नोट्स' दिले जावेत, एवढीच आमची मागणी आहे.
वांगचुक यांनी त्यांची नजरकैद आव्हान देण्यासाठी तयार केलेले 'नोट्स' त्यांच्या पत्नी डॉ. गितांजली आंगमो यांच्यासोबत शेअर करण्यास केंद्र सरकारची कोणतीही हरकत नाही, अशी माहिती केंद्र सरकारने आज (१५ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयाला दिली. या माहितीची दखल घेत, न्यायालयाने गितांजली आंगमो यांनी वांगचुक यांच्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखालील (NSA) नजरकैदेला आव्हान देणारी याचिका २९ ऑक्टोबरपर्यंत तहकूब केली. याचिकाकर्त्यांचे वकील, कपिल सिब्बल यांनी याचिकेत काही अतिरिक्त कारणे आणि मागण्या समाविष्ट करण्यासाठी सुधारणा करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय घेतला.
२४ सप्टेंबर रोजी लडाखमधील लेह येथे स्वतंत्र राज्यासाठी आणि घटनात्मक संरक्षणा'साठी झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. यावेळी उसळलेल्या हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला. या हिंसाचारात सहभाग असल्याचा आरोप सोनम वांगचुक यांच्यावर आहे. त्यांना २६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA) अंतर्गत अटक करण्यात आली होती. या कारवाईविरोधा त्यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
या प्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि इतर अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात उत्तर मागणारी नोटीस जारी केली होती. सर्वोच्च न्यायालयात लेह जिल्हाधिकारी रोमिल सिंग डोंक यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, या प्रकरणी सर्व संबंधित तथ्ये विचारात घेतल्यानंतर वांगचुक यांना अटक करण्यात आली. याबाबत २६ सप्टेंबर रोजी आदेश देण्यात आला. हा आदेश राज्याच्या सुरक्षेसाठी, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी आणि समुदायासाठी आवश्यक सेवांसाठी हानिकारक असलेल्या कृतींवर आधारित होता. तसेच वांगचुक यांना बेकायदेशीरपणे ताब्यात ठेवण्यात आले होते, त्यांना अन्यायकारक वागणूक देण्यात येत होती, आरोप फेटाळून लावत राष्ट्रीय सुरक्षा कायदा, १९८० अंतर्गत त्यांना ताब्यात घेत असल्याची तसेच राजस्थानातील जोधपूर येथील मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येत असल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती.
सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधातील कारवाईनंतर त्यांच्या पत्नीने बंदी प्रत्यक्षीकरण याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. बंदी प्रत्यक्षीकरण (हॅबियस कॉर्पस) याचिका प्रत्यक्ष व्यक्तीला तत्काळ न्यायालयासोमर हजर करण्याचा आदेश देण्यासाठी दाखल केली जाते. एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीररीत्या अटक केल्यास, न्यायालय अशा व्यक्तीला तत्काळ न्यायालयासमोर हजर करण्याचा आदेश देऊ शकते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२ आणि २२६ अंतर्गत नागरिकांना बंदी प्रत्यक्षीकरण याचिका दाखल करण्याचा अधिकार आहे.
अभिनेता अमीर खान याची प्रमुख भूमिका असणार्या 'थ्री इडियट्स' चित्रपटाची प्रेरणा हे सोनम वांगचूक यांच्याकडूनक घेण्यात आली. हा चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर वांकचूक यांच्या कार्यात देशभरात झाले. ५९ वर्षीय सोनम वांगचूक हे अभियंता-शिक्षक-हवामान कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात.