पुढारी ऑनलाईन डेस्क : सुखबीर सिंग बादल यांनी शिरोमणी अकाली दलाच्या (Shiromani Akali Dal) अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती पंजाबचे माजी शिक्षणमंत्री दलजीत चीमा यांनी Xपोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
पुढील निवडणुकीचा मार्ग मोकळा करण्यासाठी सुखबीर सिंग बादल यांनी शिरोमणी अकाली दलाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज (दि.१६) पक्षाच्या कार्यकारिणीकडे आपला राजीनामा सुपूर्द केला आहे.च्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केल्याबद्दल आणि संपूर्ण कार्यकाळात मनापासून पाठिंबा आणि सहकार्य दिल्याबद्दल त्यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले असल्याचेही चीमा यांनी आपल्या X पोस्टमध्ये नमूद केले आहे.
अकाली दल कार्यकारिणीचे अध्यक्ष बलविंदर सिंग भूंदर यांनी चंदीगड येथील पक्षाच्या मुख्यालयात सोमवारी दुपारी १२ वाजता कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलवली आहे. अकाली दलाच्या अध्यक्षपदासह पदाधिकारी आणि कार्यकारिणीच्या निवडणुका १४ डिसेंबरला होणार आहेत. शिरोमणी अकाली दल हा एक लोकशाही तत्वावर चालणारा पक्ष आहे. पक्षाच्या घटनेनुसार दर 5 वर्षांनी अध्यक्षपदासाठी निवडणुका होतात. पक्षाध्यक्ष निवडीसाठी १४ डिसेंबर२०१९ रोजी निवडणूक झाली. पुढील महिन्यात, १४ डिसेंबरला आम्ही ५ वर्षे पूर्ण करणार आहोत. १८ नोव्हेंबरला आम्ही कार्यकारिणीची बैठक घेतली आहे. पक्षप्रमुख राजीनाम्याचा विचार करतील आणि निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रमही जाहीर करतील. पक्षाध्यक्षपदाची निवडणूक कोणीही लढवू शकतो, अंतिम निर्णय सभागृहात घ्यायचा आहे, ज्याच्याकडे बहुमत असेल त्याची अध्यक्षपदी निवड होईल, असेही चीमा यांनी स्पष्ट केले.