

Sugar Prices Drop: साखरेचे होलसेल आणि रिटेल मार्केटमधील दर वाढू लागल्यानंतर आता केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये आली असून त्यानंतर साखरेच्या दरात घट होताना दिसत आहे. चिनी मंडीच्या ताज्या दरानुसार दिल्लीत मंगळवारी साखर ६३ रूपये किलो विकली जात होती. यापूर्वी हा दर ६८ रूपये प्रती किलो इतका पोहचला होता.
दुसरीकडे साखरेची कानपूरमधील किंमत ही ६९ रूपयांवरून ६३ रूपयांवर आली होती. मुंबईत साखरेचे भाव ६८ रूपयांवरून ६२ रूपयांवर खाली आली. तर गुवाहाटीमध्ये ७१ रूपये प्रती किलो विकली जाणारी साखर आता ६३ रूपयांपर्यंत खाली आली आहे. चेन्नईत हाच दर ७० रूपये होता आता तो घसरून ६७ रूपयांपर्यंत खाली आला आहे.
साखरेच्या होलसेल दराबाबत विचार केला तर मुंबई आणि रायपूरमध्ये साखरेचे दर प्रति क्विंटल ६००० रूपयाच्या खाली आले आहेत. मुंबईमध्ये दरामध्ये तब्बल ८५० रूपयांची घसरण झाली असून दिल्लीत प्रति क्विंटल ६६०० रूपये विकली जाणारी साखर आता ६००० रूपये प्रती क्विंटल पर्यंत पोहचली आहे. कानपूरमध्ये देखील साखरेच्या होलसेल दरात घट झाली आहे.
१७ ऑगस्टनंतर साखरेच्या दराने अचानक उसळी घेतली होती. दिल्लीमध्ये १७ ऑगस्ट रोजी हा दर ५९ रूपये किलो होता पुढच्याच दिवशी हा दर ६२ रूपये प्रती किलो पोहचला. १९ ऑगस्ट रोजी ६४ तर २० ऑगस्ट रोजी ६७ रूपयांपर्यंत पोहचला. २१ ऑगस्टला पुन्हा दर वाढून तो ६८ रूपये प्रती किलो इतका पोहचला.
यानंतर २२ ऑगस्टला दर स्थीर राहिले. १७ ते २० ऑगस्ट दरम्यान, फक्त दिल्लीतच साखरेचे दर प्रती किलो ८ रूपयांनी वाढले. देशातील इतर शहरांमध्ये देखील साखरेचे दर वाढताना दिसत होते.
साखरेचे दर वेगाने वाढू लागल्यानंतर केंद्र सरकार त्वरित अॅक्शन मोडमध्ये आले. सरकारने भाववाढीचा धोका रोखण्यासाठी कारवाई सुरू केली. साखर कारखान्यांवर वचक वाढला तसेत सरकारने १० लाख टन कच्ची साखर शुल्क मुक्त आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर साखरेच्या किंमतीत घट होताना दिसत आहे.