

नवी दिल्ली : भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीत राजकीय चर्चा झाल्याचे समजते. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये सुधीर मुनगंटीवार यांना पक्षाद्वारे महत्त्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते अशा चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. दरम्यान, सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही भेट घेतली.
सुधीर मुनगंटीवार शुक्रवारी दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी विविध नेत्यांच्या भेटी घेतल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, राज्यातील काही प्रश्न आणि त्या संदर्भातली निवेदने अमित शाह आणि इतर संबंधित मंत्र्यांना द्यायची होती. या भेटीदरम्यान राज्यातील विविध विषयांसंदर्भात चर्चा झाली. सुधीर मुनगंटीवार लवकरच मंत्रिमंडळात येणार का, याविषयी विचारले असता ते म्हणाले की, राजकारणात काही मिळावे म्हणून आलो नाही. त्यामुळे मंत्रीपदासाठी वगैरे मी दिल्ली दौरा केला, असे अजिबात नाही.
ते काम गृहमंत्र्यांचे...- मुनगंटीवार
राज्यातील प्रश्नांवर विचारले असता मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात द्वेष पसरवला जातोय की काय यावर लक्ष द्यायचे काम गृहमंत्र्यांचे आहे. गृहमंत्री ते काम करतील. तसेच मी मंत्रिमंडळात नाही यामागे पक्षाचे आणखी काही चांगले नियोजन असेल त्यामुळे ते होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सुधीर मुनगंटीवार यांनी अमित शाह यांना चंद्रपूर जिल्ह्यातील बांबू संशोधन संस्थेत तयार केलेला तिरंगा आणि डायरी भेट दिली.