

नवी दिल्ली : दैनिक ‘पुढारी’ टॅलेंट सर्च परीक्षेतील गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांची दैनिक ‘पुढारी’ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी भेट घडवून आणली. यावेळी दैनिक ‘पुढारी’चे समूह संपादक व ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव व संचालिका डॉ. सौ. स्मितादेवी जाधव उपस्थित होत्या. राष्ट्रपतींची ही भेट आमच्यासाठी अविस्मरणीयच होती, अशी प्रतिक्रिया विद्यार्थी आणि शिक्षकांनी व्यक्त केली. दैनिक ‘पुढारी’च्या टॅलेंट सर्चमधून तुम्ही टॅलेंटेड बनला, आता सूर्याला गवसणी घालण्याची संधी घ्या, असे आवाहन यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना केले.
या भेटीत राष्ट्रपती मुर्मू यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या माहितीचे पुस्तक व चॉकलेट भेट दिले. राष्ट्रपतींनी सर्व अतिथींना राष्ट्रपती भवनाची माहिती घ्या, राष्ट्रपती भवनाचा अभ्यास करून घ्या, असेही सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनातील संग्रहालयाची पाहणी केली. आदिवासी कलाकृतींचा अनमोल ठेवाही त्यांनी पाहिला. यानंतर राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणातही काही काळ विद्यार्थ्यांनी घालवला. देशाच्या प्रथम नागरिक, सर्वोच्च व्यक्ती असलेल्या राष्ट्रपतींशी थेट झालेली भेट, राष्ट्रपती भवनाची भव्यदिव्य इमारत, त्या इमारतीत, त्याच्या परिसरात घालवलेला वेळ यामुळे विद्यार्थी भारावून गेले होते.