नवी दिल्ली: गेल्या दीड वर्षापासून आयटीतील रोजगाराची बंद दारे आता नवोदितांसाठी सुवर्णसंधी घेऊन आली आहेत. आयटी क्षेत्रातील नावाजलेले नाव असलेल्या इन्फोसिसने कॅम्पस इंटव्ह्यूच्या माध्यमातून निवडलेल्या मुलांना ९ लाख रुपयांचे वार्षिक वेतन देण्याचे ठरविले आहे.
पदवी हातात पडताच घसघशीत वेतनाची नोकरी उपलब्ध होणार आहे. टीसीएसने यापूर्वीच प्राईम या प्रकल्पाअंतर्गत नवोदितांना ९ ते अकरा लाख रुपये वार्षिक वेतन देऊ करणार असल्याचे जाहीर केले आहे. बेंगळुरू येथील एका कंपनीने नवोदितांना तीन ते साडेतीन लाख रुपयांचे वार्षिक वेतन देऊ केले आहे.
त्यावरून वादंग सुरू झाला होता. इन्फोसिसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार कंपनी नवोदितांना ९ लाखांपर्यंत वेतन देऊ करणार आहे. उमेदवारांच्या कौशल्यानुसार चार ते साडेसहा लाख आणि नऊ लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक वेतन दिले जाणार आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस नवोदित उमेदवारांना संगणकीय प्रणाली विकसनासाठी घेणार आहे. टीसीएसची वेतनश्रेणी ९ ते अकरा लाख रुपये वार्षिक अशी आहे. तसेच, टीटीएस यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता, जनरेटीव्ह एआय आणि मशिन लर्निंग अशा विविध प्रकल्पांसाठी भरती करणार आहे.
आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये देशातील पाच बड्या आयटी कंपन्यांनी ७० हजार लोकांना कामावरून कमी केले होते. जून-२०२४ अखेरीस संपलेल्या जून-२० आर्थिक वर्षात टीसीएसमध्ये ५,४५२ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली. त्यापूर्वीच्या तीन तिमाहीत कामगार कपात करण्यात आली. या काळात १३,२४९ कामगारांची कपात करण्यात आली. इन्फोसिसमध्ये एप्रिल ते जून या कालावधीत दोन हजाराने कामगार संख्या कमी झाली. देशातील चार मोठ्या कंपन्या ८२ हजार कामगार भरती करणार आहे. एचसीएलटीटेक १० हजार आणि विप्रो १२ हजार नवोदितांना संधी देणार आहे.