

नवी दिल्ली : अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातातून 40 वर्षीय विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी बचावले आहेत. या भीषण दुर्घटनेनंतर विश्वास यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे.
गुजरातच्या अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या एअर इंडिया विमान अपघातात भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक, 40 वर्षीय विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी होते, जे या भीषण दुर्घटनेत बचावले. या अपघातानंतर विश्वास यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. अपघाताच्या भयानक आठवणी, भावाच्या मृत्यूचे दुःख आणि मृत्यूच्या दारातून परत आल्याच्या वास्तवाने त्यांना आतून हादरवून टाकले आहे. आता ते या मानसिक आघातातून सावरण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत आहेत.
एअर इंडियाचे बोईंग 787 ड्रीमलाइनर विमान अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटांतच कोसळले. लंडनला जाणार्या या विमानात विश्वास यांचा भाऊ अजय यांच्यासह 241 प्रवासी होते. या अपघातात विमानातील सर्व 241 प्रवासी आणि जमिनीवरील 19 लोकांचा मृत्यू झाला. हा अपघात केवळ प्रवाशांसाठीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांसाठीही एक मोठी शोकांतिका ठरली.
अपघातानंतर विश्वास यांचे चुलत भाऊ सनी यांनी सांगितले की, या दुर्घटनेतून चमत्कारिकरीत्या वाचल्यानंतरही विश्वास आतून पूर्णपणे खचले आहेत. ते अजूनही अपघाताच्या आणि भावाच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. मध्यरात्री ते अचानक दचकून उठतात आणि त्यानंतर कित्येक तास त्यांना झोप लागत नाही.
कुटुंबाने विश्वास यांना या मानसिक धक्क्यातून बाहेर काढण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपूर्वीच विश्वास यांनी नियमित समुपदेशन सुरू केले आहे, जेणेकरून ते या मानसिक जखमेतून सावरू शकतील.