

लखनौ; वृत्तसंस्था : कानपूरहून दिल्लीकडे जाणाऱ्या शताब्दी एक्स्प्रेसवर फिरोजाबादजवळ दगडफेकीची घटना बुधवारी रात्री घडली. विशेष म्हणजे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे ज्या डब्यात प्रवास करत होते, त्याच डब्याच्या खिडकीच्या काचेचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापतीची बाब समोर आली नाही.
शताब्दी एक्स्प्रेस (क्रमांक १२००३) रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास फिरोजाबाद आऊटर परिसरातून जात असताना अचानक एक दगड ई-१ बोगीवर आदळला. या डब्यात मोहन भागवत प्रवास करत असल्याचे सांगितले जात आहे. दगडाच्या जोरदार प्रहारामुळे खिडकीची काच फुटली आणि काही काळ प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकाऱ्यांनी तत्काळ संबंधित डब्याची तपासणी केली. तसेच परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर रेल्वेला पुढील प्रवासासाठी परवानगी देण्यात आली. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले की, या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही आणि मोहन भागवत यांच्यासह सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. आवश्यक तपासण्या पूर्ण झाल्यानंतर शताब्दी एक्स्प्रेसने दिल्लीकडे प्रवास पुन्हा सुरू केला आणि रात्री १०.१३ वाजता नियोजित वेळेनुसार राष्ट्रीय राजधानीत पोहोचली.
दरम्यान, घटनेनंतर सरकारी रेल्वे पोलीस तसेच रेल्वेच्या विविध विभागांचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दगड नेमका कसा आदळला, तो अपघाती होता की जाणीवपूर्वक फेकण्यात आला होता, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यासंदर्भात चौकशी सुरू असून पुरावे गोळा करण्यात येत आहेत. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, चौकशी अहवाल आल्यानंतरच घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होईल.