

विशाखापट्टणम; वृत्तसंस्था : अत्याधुनिक स्टेल्थ फ्रिगेट ‘आयएनएस महेंद्रगिरी’ शनिवारी अधिकृतपणे नौदलात सामील करण्यात आली. पूर्व नौदल कमांडच्या मुख्यालयात केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा जलावतरण सोहळा पार पडला. ‘प्रोजेक्ट १७ ए’ वर्गातील ही सहावी युद्धनौका आहे.
अत्याधुनिक नौदल प्लॅटफॉर्मची देशांतर्गत डिझाईन आणि बांधणी करून तिची प्रत्यक्षात तैनाती ही भारताच्या संरक्षण सिद्धतेतील मोठी झेप मानली जात आहे. ही युद्धनौका भारतीय सशस्त्र दलांची लवचीकता आणि अदम्य संकल्पाचे प्रतीक आहे. ती नौदलात समावेश होणे हा ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचा एक मुख्य स्तंभ मानला जात आहे. लष्करी उपकरणांचा आयातदार देश ते अत्याधुनिक युद्धनौकानिर्मितीचे जागतिक केंद्र बनण्यापर्यंतच्या भारताच्या प्रवासाचे प्रतिबिंब असल्याचे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
दरम्यान, या सोहळ्यात बोलताना केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि मजबूत पारंपरिक लष्करी शक्ती राखणे यामधील महत्त्वपूर्ण संतुलनावर भर दिला. ड्रोन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सायबर युद्ध आणि हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांच्या क्रांतिकारी प्रभावाचा स्वीकार करतानाच, राष्ट्रीय सुरक्षेचा पाया हा प्रशिक्षित सैनिकांचा संकल्प आणि त्यांचे कौशल्य हाच असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘आयएनएस महेंद्रगिरी’, ‘ब्रह्मोस’ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राने, प्रगत मल्टिफंक्शन रडारने आणि स्वदेशी पाणबुडीविरोधी व इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणालीने सज्ज आहे. त्यामुळे भारतीय नौदलाची युद्धसज्जता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
ब्रह्मोस : सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे
मध्यम पल्ल्याची हवेत मारा करणारी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे
पाणबुडीविरोधी
युद्धसामग्री
प्रगत इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि एकात्मिक कॉम्बॅट मॅनेजमेंट सिस्टीम
वेगवान हालचाली आणि दीर्घकाळ समुद्रात टिकून राहण्यासाठी - कम्बाईंड डिझेल किंवा गॅस प्रणोदन प्रणाली