नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने मंगळवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. यामध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत. या प्रकरणाची सुनावणी 25 एप्रिल रोजी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयात होणार आहे.
न्यायालयाने ईडीकडून या प्रकरणाची केस डायरीही मागितली आहे. दरम्यान, 2012 मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांशी संबंधित लोकांविरुद्ध या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर ईडीने 13 जून 2022 रोजी राहुल गांधींची चौकशी केली होती. नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी संबंधित कंपनी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) ची 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर काही दिवसांनी अंमलबजावणी संचालनालयाने ही कारवाई केली आहे. या मालमत्तांमध्ये दिल्ली, मुंबई आणि लखनौमधील प्रमुख मालमत्तांचा समावेश आहे. यामध्ये राष्ट्रीय राजधानीतील बहादूरशाह जफर मार्गावरील हेराल्ड हाऊसचाही समावेश आहे.
जून 2022 मध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणात राहुल गांधी यांची पाच दिवसांत 50 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर 21 जुलै 2022 रोजी नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी यांची तीन दिवसांत 12 तास चौकशी करण्यात आली होती. या काळात त्यांना 100 हून अधिक प्रश्न विचारण्यात आले होते.